शरद पवार पंतप्रधान व्हावेत हे स्वप्न नक्की साकार होईल; राष्ट्रवादीकडून दिल्लीच्या निवडणुकीची तयारी सुरू!

NCP

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्ष राज्यात पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांना जोडण्याचा जोमाने प्रयत्न करत आहे. यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. तर, दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीतही आता राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते कामाला लागले आहेत. याची पुष्टी स्वतः राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली आहे.

एवढेच नाही तर, आता पवारसाहेब पंतप्रधान व्हावेत हे आमचे स्वप्न असून ते नक्की साकार होईल, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

सध्या खासदार अमोल कोल्हे दिल्लीत आहेत. नुकतेच लोकसभेत रोखठोक भाषण केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही (Supriya Sule) उपस्थित होत्या.

त्यानंतर खासदार कोल्हे यांनी शरद पवार पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. खासदार अमोल कोल्हे दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले, मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. त्यामुळे देशातील जनतेला शाश्वत विकासाची आस आहे. त्यामुळे शाश्वत विकासाचे मॉडेल असलेल्या शरद पवारसाहेबांकडे देश आशेने बघतोय. पवारसाहेब पंतप्रधान व्हावेत हे आमचे स्वप्न असून ते नक्की साकार होईल. ते म्हणाले, तुमचा तुमच्या स्वप्नावर विश्वास असेल तर ते नक्की साकार होते. शरद पवारसाहेब पंतप्रधान व्हावेत, हे आमचे स्वप्न आहे. आमच्या स्वप्नावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ही केवळ माझीच इच्छा नाही तर प्रत्येक मराठी माणसाची आहे. पवारसाहेब पंतप्रधान झाले तर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल. प्रत्येकाने मनावर घेतले तर हे स्वप्न नक्की साकार होईल.

दिल्लीच्या निवडणुकीची तयारी सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचेही खासदार कोल्हेंच्या वक्तव्यानंतर दिसून येते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमातून त्याची प्रचिती आली. खासदार अमोल कोल्हे यांनीही याबाबत सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, प्रत्येक पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकही प्रयत्न करत आहेत. आम्ही नक्कीच दिल्लीतही पक्षाचा विस्तार करू, असे कोल्हे यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभेबाहेर माध्यमांसमोरही अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. महागाईमध्ये ७२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘अब की बार…’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारच्या काळातील ही वाढ झाली आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण देशातील बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. रेल्वेच्या ६३ हजार जागांसाठी लाखो अर्ज आले होते. महागाई, बेरोजगारी आणि तीच परिस्थती अर्थव्यवस्थेची आहे.

अर्थव्यवस्था सातत्याने गाळात चालली आहे. आत्मनिर्भर भारत ही घोषणा मूठभर भांडवलदारांच्याच फायद्याची आहे. आता शाश्वत विकासाची आस जनतेला आहे. या शाश्वत विकासाचे मॉडेल म्हणजे पवारसाहेब आहेत. देश पवारसाहेबांकडे आशेने बघतोय, असे कोल्हे यांनी सांगितले. सरकारनामाने हे वृत्त दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER