केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा आल्यावरच शरद पवारांकडे वेळ नसतो : विनायक मेटे

Sharad Pawar - Vinayak Mete

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून समलिंगी आणि तृतीयपंथीयांसाठी वेगळी शाखा तयार करण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टींसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांना वेळ मिळतो. केवळ मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आल्यावर त्यांच्याकडे वेळ नसतो, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही टीकेची तोफ डागली. मागच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही.

आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, त्यासाठी अशोक चव्हाण (Ashok Chavan) हेच जबाबदार आहेत. आम्हाला आता त्यांच्याकडून कसल्याच अपेक्षा उरलेल्या नाहीत, असे विनायक मेटे यांनी म्हटले. तसेच, आता आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे दाद मागणार आहोत. मात्र, ते घराबाहेर पडत नसल्याने आम्ही मातोश्रीवर मशाल मोर्चा घेऊन जाणार आहोत. तसेच काँग्रेस पक्षाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही? मराठा समाजाला आरक्षण न मिळून देणे, हा काँग्रेसचा अजेंडा आहे का? हे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. आता या प्रकरणाची पाच सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी ही टिप्पणी केली.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढणं ही पहिली मागणी असावी – निलेश राणेंचा घणाघात 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER