शरद पवार पुन्हा शिवसेनेवर नाराज, गृहखात्यातील वाढत्या हस्तक्षेपावर व्यक्त केली नाराजी

Sharad Pawar-CM Uddhav Thackeray

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला आलेल्या गृहखात्याच्या कारभारात शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शरद पवार (Sharad Pawar) प्रचंड नाराज झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख याबाबतची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे नाराजी व्यक्त करत हा मुद्दा मांडल्याची माहिती पुढे आली आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे महाविकासआघाडीच्या गोटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढली होती. या काळात गृह खात्यातील अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका अनिल परब यांच्या बंगल्यावर पार पडल्याचे समजते.

मात्र, आता अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझेंच्या कथित सहभागानंतर अनिल देशमुख यांच्याकडून पुन्हा एकदा अनिल परब यांच्या गृहखात्यातील हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER