‘दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात आली आहे’, पवारांचा पिचडांना टोला

Sharad Pawar - Madhukar Pichad

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना पवार यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांना लागवला.

यावेळी पवार म्हणाले की, यशवंत भांगरे माझ्या ५ वर्ष अगोदर विधानसभेचे सदस्य होते. तेमाझ्यापेक्षा ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा मोलाचा वाटा आहे. अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं, असा टोला शरद पवार यांनी पिचड यांना लगावला.

यावेळी त्यांनी एकेकाळचे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला. जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही असं म्हणत मधुकर पिचड यांचा पवारांनी शुक्राचार्य असा उल्लेख केला. राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली त्यावेळी जनतेच्या मनातल कळालं होते. जनतेला परिवर्तन हवं होते. किरण लहामटे यांनी वैभव पिचडांना पराभूत करुन ते परिवर्तन झालं आहे. कारखान्यावर 200 कोटीच‌ कर्ज झाले, जे या‌ कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा, अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्यावर नाव न घेता दुसऱ्यांदा टीका केली तर या शुक्राचार्यांना अगस्ती सहकारी साखर कारखान्यातून बाजूल करा कारखान्यासाठी मी तुम्हाला सर्वोतपरी मदत करतो, असं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी यावेळी बोलताना अकोले तालुक्यातील जनतेला आश्वासनं दिली आहेत. ती आश्वासनं पूर्ण करा, ते पूर्ण करताना अडचणी आल्या तर मला सांगा, असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. भंडारदार हा मला आवडणारा परिसर आहे. सर्वात पहिल्यांदा 9 वीत शिकत असताना सायकलवर मी रंधाफॉल बघण्यासाठी लोणी ते भंडारदरा आलो होतो ही आठवण त्यांनी सांगितली. भंडारदरा आणि अकोले भागातील लोकांना दुर्लक्षित करू नका, असा सल्लादेखील शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, मात्र स्थानिक नागरिकांशी समन्वय असणे गरजेचे आहे. तालूका इको सेन्सेटिव्ह झोन झाला तर विकासाला अनेक मर्यादा येतील, असंही शरद पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER