‘मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चा अध्यक्ष आहे, याचा विरोधकांना विसर’ – शरद पवार

sharad pawar

जालना : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला काही दिवसच उरलेले असल्याने आता प्रचाराला खरी रंगत चढलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडीकरतांना दिसून येत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेला ‘पहिलवान’ वाद चांगलाच रंगलेला आहे.

‘आमचे उमेदवार तेल लावून उभे आहेत, मात्र समोरच्यांचे पैलवान मैदानात दिसत नाहीत’ असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलंय. ‘मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चा अध्यक्ष आहे हे विरोधकांना माहिती नसावं, अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

‘आमचे पैलवान तुम्हाला मैदानात दिसत नसतील तर मग पंतप्रधानांना दिल्लीवरून परतूरमध्ये प्रचारासाठी का बोलवावं लागतं?’ असा प्रश्नदेखील पवारांनी यावेळी उपस्थित केला. ‘आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आपण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो’ असे जोरदार प्रतिउत्तरदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

‘अमित शाह हे नाव पाच वर्षांपूर्वी कुणी ऐकलं नाही आणि कुणी त्यांना पाहिलंही नाही. मात्र महाराष्ट्रात आल्यावर अमित शहा आणि नरेंद्र मोदी सर्वात अगोदर माझं नाव घ्यायला विसरत नाहीत’ असा टोला शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना हाणलाय.

शरद पवार म्हणाले, शेत मालाला भाव मिळत नाही, ऊसाच्या पिकांसाठी शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध होत नाही, विहीरीसाठी व शेतीसाठी कर्ज घेतले तर विहीर व शेतीवर जप्तीची कार्यवाही होत असल्याने कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संगातात की शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटीचे आर्थीक बजेट दिले. उपस्थित शेतकऱ्यांना कर्जमाफी व अनुदान मिळाले का? असा प्रश्न विचारत या सरकारमध्ये शेतकऱ्यांना देण्याची दानत नसल्याचे त्यांनी सांगितले. कृषीमंत्री असतांना ७० हजार कोटीचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देवून आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीलो. अशी आठवणही त्यांनी यावेळी करवून दिली.