भाजपाकडे बहुमत असूनही शरद पवारांमुळे राज्यात आघाडीची सत्ता – सुप्रिया सुळे

Supriya Sule-Mahavikas Aaghadi

रायगड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालणारे सरकार आहे. राज्यामध्ये भाजपाचे १०५ आमदार निवडून येऊनसुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर मित्रपक्षांना एकत्रित करून महाविकास आघाडीची सत्ता आणण्याची किमया शरद पवारच करू शकले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. माणगाव येथे शनिवारी महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.

महाविकास आघाडीचे सरकारने चांगले काम करत आहेत. राज्यात महिलांवर अत्याचार होऊ देणार नाही. तशी खंबीर पावले उचलली जात आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महिलांसाठी निवडणुकीमध्ये ५० टक्के आरक्षण आणून मोठी क्रांती केली आहे. सर्व स्तरांवर महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व स्तरांतून महिला आघाडीवर आहेत. शरद पवारांनी आदिती तटकरे यांना ८ खात्यांची जबाबदारी देऊन महिला सक्षम आहेत, हे दाखवून दिले. बचतगटाच्या माध्यमातून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत असल्याचे, त्या म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे महाआघाडीत मतभेद नाही – सुप्रिया सुळे

दिल्लीमध्ये गेले १० दिवस अधिवेशन सुरू आहे. परंतु गेले १० दिवस संसदेत कोणत्याही प्रकारचे कामकाज झाले नाही. दिल्लीत झालेल्या दंगलीचे उत्तर गृहमंत्री अमित शहांनी द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केली. मात्र अद्याप ते उत्तर देऊ शकले नाही. केंद्र सरकारमध्ये भाजपाचे ३०३ खासदार आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत. मात्र आमचे महाआघाडीचे केवळ १०० खासदार केंद्रात आहेत. मात्र आम्ही सर्व भाजपला पुरून उरत आहोत, असं म्हणत सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला.

रायगड जिल्ह्यात बहुतेक सर्व पदांवर महिला काम करीत आहेत. पक्षाच्या माध्यमातून सर्वांनी अशाच प्रकारचे काम करणे गरजेचे आहे. आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, सभापती, नगराध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक या सर्व पदांवर महिला म्हणून उत्तमरीत्या काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात महिलाराज सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला माजी आ. सुरेश लाड, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्षा गीता पालरेचा, राज्य महिला चिटणीस दिपिका चिपळूणकर, संगीता बक्क्म, सभापती अलका जाधव, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, तळा समाज कल्याण सभापती गीता जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.