परंपरा कायम ठेवल्याबद्दल खुद्द शरद पवारांनी दिली या मंत्र्याला शाबासकी

Sharad Pawar & Dhananjay Munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या संपूर्ण कार्याचा अहवाल सादर करण्याची परंपरा कायम ठेवली. कोरोनाशी दोन हात केल्यानंतर जून ते ऑगस्ट या दरम्यानच्या कामकाजाचा लेखाजोखा धनंजय मुंडे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार व राज्यातील जनतेसमोर सादर केला आहे.

सामाजिक न्याय विभाग, पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा स्तरावर व परळी या त्यांच्या मतदारसंघात केलेले महत्वपूर्ण कामकाज, घेतलेले निर्णय व कोरोनाविषयक उपाययोजना आदींचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात मांडण्याची सुरू केलेली परंपरा अखंडित ठेवली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर जून ते ऑगस्ट २०२० या काळात केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा अहवाल स्वरूपात सादर केला आहे. हा कार्य अहवाल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा जयंत पाटील, अन्य पक्षश्रेष्ठी यांनाही सादर केला जाणार असून, त्यांच्या कार्यालयाच्या वतीने राज्यातील जनतेसाठी प्रसिद्धीस देण्यात आला आहे.

मुंडे यांनी अहवाल सादर केल्यानंतर खुद्द पवारांनी कौतुक केले. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अविरतपणे कार्यअहवाल सादर करून त्याद्वारे पक्षाला, राज्य सरकारला तसेच राज्यातील तमाम जनतेला जाहीरपणे आपली कामे अहवाल स्वरूपात सादर करण्याची अभिनव परंपरा कायम ठेवल्याबद्दल मुंडे यांचे पवारांनी विशेष कौतुक केले. तसेच पुढेही ही परंपरा अबाधित सुरू ठेवावी अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER