हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या – शरद पवार

Sharad Pawar-Devendra Fadnavis

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरूनदेखील केवळ शिवसेनेच्या दग्याफटक्यामुळे भाजपाला विरोधात बसावे लागले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टार्गेट करत ‘हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुका घ्या’ अशा शब्दांत  फडणवीसांनी भाजपाच्या अधिवेशनातून महाविकास आघाडीला ललकारले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. फक्त राज्याची विधानसभा निवडणूक कशाला घेता? पूर्ण देशाचीच घ्या, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं. ‘हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जाऊन दाखवा. निवडणुका घ्या.’ असं फडणवीस म्हणाले होते.

त्यावर आज शरद पवार यांनीही फडणवीसांना त्यांच्याच शब्दांत उत्तर दिले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरदेखील हाच धागा पकडून हिंमत असेल तर हे विधान ट्रेंड झालेले पाहायला मिळत आहे. ‘फक्त महाराष्ट्र या एका राज्याचीच विधानसभा निवडणूक पुन्हा कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक घ्या’ असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी भीमा कोरेगाव, एल्गार परिषद अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.

संभाजी भिडेंमुळे कोरेगाव-भीमामध्ये हिंसा झाली – शरद पवार