शरद पवार काहीही घडवू शकतात : नारायण राणे

महाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीत

Narayan Rane - Sharad Pawar

मुंबई : महाविकास आघाडीचा पाया रचणारे, मुख्य सुत्रधार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. कॉंग्रसे, राष्ट्रवादी व शिवसेना मिळून हे सरकार स्थापन झाले आहे. परंतु, सरकार स्थापनेपासूनच या तीन पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील या सरकारमधील अनेक नेते आपली नाराजी उघडपणे व्यक्त करतात. त्यातच अनलॉकनंतर पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंनी परस्पर घेतल्याने शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली व काल ते प्रत्यक्ष ठाकरेंना भेटलेत. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टिप्पणी केली आहे. ते बीबीसी मराठीशी बोलत होते.

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर राणे म्हणाले, शरद पवार प्रस्ताव देतात ते एकाच पक्षाला देतात यावर विश्वास कितपत ठेवावा, हे विचार करावं असा सल्ला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. जे झालं ते झालं त्याला इतिहास साक्ष आहे, पवारांकडून राजकीय आणि सरकारबद्दल प्रस्ताव येतात ते आपल्यालाच दिला असेल असं विश्वास ठेऊन पुढे जाऊ नये असं मला वाटतं. चीनच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी राष्ट्रीय भावनेतून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला असेल, त्यांचे विधान काँग्रेसला एकाकी पाडण्याबाबत नसावं, पण शरद पवार काहीही घडवू शकतात असं सूचक विधान नारायण राणे यांनी केलं आहे.

तसेच ते म्हणाले, राज्यात भाजपा चांगले सरकार देऊ शकते, महाराष्ट्राच्या इतिहासात घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही, भाजपा सरळ मार्गाने सत्तेवर यायला तयार आहे. या सरकारमध्ये अंतर्गत इतके वाद आहेत की सरकार एक वर्ष तरी चालेल का? याची शंका आहे. तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत वाद आहेत. कोणाचं कोणाला पटत नाही अशा शब्दांत राणेंनी महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका केली.

एवढेच नाही तर, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे, याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीत. असेही राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER