शरद पवारांच्या धडाकेबाज प्रचारामुळे शिवसेनेच्या गोटात धडकी

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्याला ( २४ ऑक्टोबर) हाती येणार असून, सर्वच पक्षांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळल्याने महायुती सत्तेवर येण्याची खात्री असूनही शिवसेनेच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेचे १२४ पैकी सर्वाधिक ५७ उमेदवार हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी थेट लढत देत असल्याने त्याचा फटका आपल्या संख्याबळाला तर बसणार नाही ना, अशी धडकी शिवसेनेत भरली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप-शिवसेना या सत्ताधारी युतीला कोंडीत पकडण्यात विरोधक कमी पडले, असे चित्र दिसून आले होते. काँग्रेस हा मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रव्यापी प्रचारात काँग्रेस मागे पडला. पक्षाचे सर्व नेते आपापल्या भागातच प्रचारसभा घेताना दिसून आले. मात्र विरोधकांची उणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरून काढली. त्यांनी तुफानी प्रचार करत सरकारच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले. पवारांच्या या प्रचार धडाक्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा राजकीय लाभ होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने १२४ उमेदवार उभे केले. त्यापैकी सर्वाधिक ५७ जागांवर सेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे.

तर ५२ जागांवर सेना-काँग्रेस उमेदवारांमध्ये लढत आहे. १५ जागांवर मनसे व इतर पक्षांच्या उमेदवारांसह सेनेच्या उमेदवारांची लढत आहे. त्यातच पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये आणि मराठवाड्यात शरद पवार यांच्या धडाकेबाज प्रचारामुळे राष्ट्रवादीची चांगली ताकद दिसून आली. या भागांत राष्ट्रवादी व शिवसेनेत अनेक जागांवर चुरशीची लढत होत आहे. शरद पवार यांच्या आक्रमक प्रचारामुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले मतदार हे पुन्हा पक्षाकडे ओढले गेले असे बोलले जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीला याचा फायदा झाला तर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार हे आताच स्पष्ट झाले.