शरद पवार अशोक चव्हाण यांची दिल्लीत भेट, मराठा आरक्षणासाठी खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

Ashok Chavan-Sharad Pawar

नवी दिल्ली :  मराठा आरक्षण (Maratha Reservation)उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) यांची दिल्लीत भेट घेतली. सुमारे पाऊण तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

येत्या 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan), मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर आदी नेते दिल्लीत आले आहेत. या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने पवारांशी पाऊण तास चर्चा केली. या बैठकीत चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबतची संपूर्ण माहिती दिली. तसेच कायदेशीरबाबींवर चर्चा केली. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नेण्याबाबत चर्चाही केली. हे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यास पवारांनी होकार दिल्याचं चव्हाणांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार – अशोक चव्हाण यांच्या भेटीवरून विनायक मेटे यांनी चव्हाणांवर टिकास्त्र डागले आहे. चव्हाण मराठा आरक्षणासाठी नव्हेत तर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची मोर्चेबांधणी करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली होती. त्याबाबत चव्हाण यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता मेटेंच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, असं सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER