शरद पवार आणि संजय राऊत चार्टर्ड विमानाने दिल्लीकडे रवाना, चर्चेला उधाण

Sanjay Raut - Sharad Pawar

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेत (Shiv Sena) सुरू असलेला वाद अधिकच चव्हाट्यावर आला आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची नाहक बदनामी होत असल्याच्या कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिल्या होत्या. महापालिकेने केलेल्या कारवाईचा टायमिंग चुकला असेही ते म्हणाले होते.

तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) पक्षाने या वादापासून दूर राहणे पसंत केले. मात्र सत्तेत सहभागी असल्याने याचा दूरगामी परिणाम पक्षाला बसू शकतो याचा विचारही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केला असावा. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. तसेच हा वाद येथेच संपवावा, अशी ताकीद सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहितीही पुढे आली होती. या सर्व घडामोडीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच स्पष्टीकरण दिले होते. शरद पवार आणि सोनिया गांधी हे मुख्यमंत्र्यांवर नाराज नसल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

मात्र आज सकाळी अचानकपणे शरद पवार आणि संजय राऊत चार्टर्ड विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. काही वेळातच ते दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यामुळे सोनिया गांधी शिवसेनेवर नाराज तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण १४ तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनासाठी जात असल्याचे पवार आणि राऊत यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. अधिवेशन सुरू व्हायला अजून तीन दिवस शिल्लक असताना अचानक आजच दिल्लीत का जावे लागले, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांच्या घडामोडीवरून महाविकास आघाडीत आलबेल नाही, अशी चर्चा सुरू होतीच. त्यातच आता पवार आणि राऊतांच्या दिल्लीवारीवरून शंका उपस्थित होत आहे. आज किंवा उद्या दोन्ही नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यास आघाडीत आलबेल नसल्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER