शरद पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील – उदयनराजे

udayanraje bhosale

सातारा :- भाजपचे नवनियुक्त विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अपशब्दांत टीका केली. त्या टीकेची झळ पडळकरांना भोगावीदेखील लागत आहे. पडळकरांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अक्षरशः त्यांना झापले आहे. राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले राजे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र आपली मधली भूमिका ठेवली आहे. शरद पवार – पडळकर त्यांचं ते बघून घेतील, असे उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

कोणी कोणाबद्दल काय बोलावे हे ज्यांचे ते ठरवत असतो. जे कोण कोणाला बोलले ते मला विचारून नाही बोलले. ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांना विचारा. जे कुणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारून देणार नाहीत, अशा फटकळ शब्दांत उदयनराजेंनी  प्रतिक्रिया दिली. माझं मत मी परखडपणे मांडत असतो, असेही उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन त्याचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचारलं असता, कोरोनाचा बाऊ केला जात असल्याचे उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे म्हणाले, “ज्या पद्धतीने स्वीडनमध्ये हर्ड इम्युनिटी अर्थात सामाजिक रोगप्रतिकारशक्ती केली आहे, त्या पद्धतीने भारतात केली जावी. कारण इतर व्हायरसप्रमाणे कोरोना हा व्हायरस आहे, त्याचा बाऊ करू नये. इतर आजारातदेखील अनेकांचा मृत्यू होतो. लोकांना घाबरवू नका, लोकांना वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल. लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता किती वेळा लॉकडाऊन करणार?” असा सवाल उदयनराजेंनी विचारला. कोरोनाबाबत लोकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER