शरद पवारांना भेटायला बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन बारामतीत?

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) यांचे शुक्रवारी (ता.१२) सकाळी अचानक बारामती विमानतळावर आगमन झाले . ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्यासाठी आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे .मात्र ते आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत आले असल्याची माहिती आहे .

अजय देवगण सध्या आपल्या आगामी ‘मेडे’ या सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. तो स्वतः या सिनेमात वैमानिकाच्या भूमिकेत आहे. अमिताभही या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. आकाशातून काही तर विमानतळावर काही दृश्यं चित्रीत करण्यासाठी त्यांनी बारामती विमानतळाची निवड केली होती.

सकाळच्या सुमारास अमिताभ बच्चन तसेच अजय देवगण यांचे खासगी विमानाने बारामती विमानतळावर आगमन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे तसेच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले, त्यानंतर अमिताभ यांनी आपला वेळ शुटिंगसाठी दिला.

दरम्यान, बारामती विमानतळ शहरापासून लांब असल्याने तिथे वर्दळ नसते, त्याने व्यत्यय येत नाही, या कारणामुळे या ठिकाणाची शुटिंगसाठी निवड करण्यात आली होती. अमिताभ बच्चन शुटिंग करुन परतल्यानंतर बारामतीत ते येऊन गेल्याची बातमी पसरली. काही ठिकाणी तर ते शरद पवार यांना भेटायला आल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER