शेतकऱ्यांच्या हितासाठी पवारांचा असाही विरोध, कृषी विधेयकाच्या चर्चेला दांडी

Sharad Pawar

नवी दिल्ली : अत्यंत महत्वाच्या आणि ऐतिहासिक अश्या तीन कृषी विधेयकांना रविवारी राज्यसभेत मंजुरी मिळाली. हे विधेयक मंजूर होण्याआधी गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण तापले होते. सरकारने बहुमताच्या जोरावर ही तीन विधेयक लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही (Rajya Sabha) मंजूर केली. पण या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन पक्षांची भूमिका मात्र संदिग्ध दिसून आली.

राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी चर्चेत जे मत मांडलं त्यावरून राष्ट्रवादीचा या विधेयकाला विरोध होता हे स्पष्ट झाले नाही. असं क्रांतिकारी विधेयक आणण्याआधी शरद पवार, प्रकाश सिंग बादल यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सभागृहाच्या कामकाजाबद्दल काटेकोर असतात. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाच्या चर्चेदरम्यान ते गैरहजर राहिले.

विशेष म्हणजे मागच्या वर्षी नागरिकत्व कायद्यावरून राज्यसभेत अत्यंत महत्त्वाच्या मतदानाच्या दिवशीही राज्यसभेत राष्ट्रवादीच्या खासदारांनी दांडी मारली होती. त्यामुळे राष्ट्रवादी सार्वजनिक व्यासपीठावर एक भूमिका आणि प्रत्यक्ष सभागृहात मात्र थेट भूमिका न घेता उलट सरकारला अप्रत्यक्ष मदतच करते आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची (Shiv Sena) हीच भूमिका बघायला मिळत आहे. कारण कुठल्याही मुद्द्यावर विधेयकावर पक्षाची म्हणून एक भूमिका असते. लोकसभेत एक आणि राज्यसभेत दुसरंच अशी भूमिका नसते. पण शिवसेनेची गेल्या दोन-तीन विधेयकावर लोकसभेत एक भूमिका आणि राज्यसभेत दुसरी असे पाहायला मिळाला आहे. या तीन कृषी विधेयकांना शिवसेनेने लोकसभेत समर्थन केलं होतं. पण राज्यसभेत मात्र त्यांनी विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शिवसेनेचे सदस्य राज्यसभेत आलेच नाही त्यामुळे शिवसेनेला एक प्रकारे फायदा झाला.

नागरिकत्व कायदा वरूनही शिवसेनेनं लोकसभेत समर्थन आणि राज्यसभेत मतदानावेळी दांडी मारली होती. महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेनंतर राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेच्या मदतीची गरज काँग्रेसला (Congress) काही मुद्द्यांवर वाटते आणि ती दाखवताना शिवसेनेची ही कोंडी होत आहे का असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER