शिवभोजन’ थाळीच्या धर्तीवर पुण्यात ‘शरद भोजन’ योजना लवकरच

पुणे :- करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या भारतात लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब लोकांसमोर मोठे संकट उभे झाले आहे. त्यांच्यासमोर दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न उद्भवला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने ‘आणि महापालिकेने महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन थाळीच्या धर्तीवर शरद भोजन योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे पुण्यातील निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती व ज्येष्ठ नागरीक यांना दोन वेळेचे अन्न पुरविण्याचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना यामुळे दोन वेळेचे पोटभर जेवण मिळणे शक्य होणार आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन थाळीच्या धर्तीवर ही योजना असल्याचे पुणे महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. या योजनेमध्ये वरीलप्रमाणे निराधार दिव्यांग/ व्यक्तीच्या गावातील अंगणवाडीतील सेविका हीत्या व्यक्तीस जररोज दोन वेळेचे जेवण तयार करून देईल. ग्रामपंचायतमधील अंगणवाडी मदतनीस यांच्यामार्फत जेवणाची व्यवस्था करणे आणि त्याला अन्न पुरवठा करणे याकरिता व्यक्तीनिहाय ५० रूपये याप्रमाणे थाळीचा दर ठरवण्यात आला आला आहे. दोन वेळेच्या जेवणाकरीता अंगणवाडी मदतनीस अशा निराधार दिव्यांगाणा जेवण तयार करून पुरविणे व या अनुषंगाने अंगणवाडी मदतनीस यांच्या वैयक्तिक खात्यावर ५० रूपये प्रमाणे दोन वेळचे १०० रूपये प्रतिदिन अनुदान जमा करण्यात येणार आहे.

दरम्यान, मदतनीस यांना पुणे महानगरपालिकेकडून थाळीमागे ० रूपयांचं मानधन मिळणार आहे. पण, निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती व ज्येष्ठ नागरीक यांना प्रतिथाळी किती रूपये द्यावे लागतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे त्यांना मोफत जेवण मिळणार की काही पैसे मोजावे लागणार हे गुलदस्त्यात आहे.