“शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा…! : शरद केळकर

Sharad Kelkar

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . चित्रपटात नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेता अजय देवगण साकारणार असून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मराठमोळा अभिनेता शरद केळकर वठवणार आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी चित्रपटातील काही कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. मात्र यावेळी घडलेला एक किस्सा सर्वांचे लक्ष वेधून गेला .

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित करताना अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना चित्रपटाशी संबंधीत अनेक प्रश्न विचारण्यात आले.

चित्रपटात शरद केळकर साकारत असलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न विचारताना एकाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शरद केळकरला ते खटकलं आणि त्याने महाराजांना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हणायला सांगितले. शरदच्या मनातील शिवाजी महाराजांचा आदर पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला.

दरम्यान तान्हाजी’च्या पोस्टरचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक करण्यात आलं. त्याचप्रमाणे नेटकऱ्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तानाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते.‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक ओम राऊत यांनी केले आहे.

‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’चा ट्रेलर रिलीज