शंतनु आणि शिवाजी महाराज

शंतनु आणि शिवाजी महाराज

कलाकार एखादी भूमिका करतात हे जितके  खरे आहे त्यापेक्षा जास्त ती भूमिका जगत असतात हेदेखील तितकेच खरे आहे. एखाद्या मालिकेमध्ये त्या भूमिकेशी समरस होताना त्या व्यक्तिरेखेचे अनेक पैलू त्यांच्या परिचयाचे होतात . तसेच सिनेमांमध्येदेखील कलाकाराने केलेली भूमिका तो  अभिनयाने इतकी सकस करतो की वर्षानुवर्ष त्या भूमिकेमुळे तो कलाकार रसिकांच्या मनात टिकून राहतो. त्यात जर कलाकारांना समाजातील आदर्श असलेल्या किंवा त्याही पुढे जाऊन एखाद्या युगपुरुषाची भूमिका करायला मिळाली तर त्याहून वेगळा आनंद नाही. शंतनु मोघे (Shantanu Moghe) या अभिनेत्याने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj)भूमिका केली आहे. त्या भूमिकेत त्याने अभिनयाने सोनं केलं .

शंतनु असं सांगतो की, “या भूमिकेने मला शिवाजी महाराज नव्याने समजले. जाणिवेतून मी माणूस म्हणून घडलो.” हे केवळ शंतनु कॅमेऱ्यासमोर प्रसिद्धीसाठी बोलण्यापुरते म्हणाला नाही तर खरंच त्याच्या मनात शिवाजी महाराजांविषयी वेगळाच आदर कायम होता आणि या भूमिकेनंतर तो कायम राहिला. नुकताच शंतनु मुंबईमध्ये प्रवास करत असताना त्याला एका रिक्षावर शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली दिसली. ती प्रतिमा होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील शंतनूने वठवलेल्या शिवाजी महाराजांच्या लूकमधील.

हे पाहून त्याला आनंदही झाला आणि सोबत एक जबाबदारीची जाणीवही झाली.  त्या मालिकेतील शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील शंतनूचा फोटो होता हे पाहून त्याला एक अभिनेता म्हणून नक्कीच अभिमानही वाटला. तेव्हा तो स्वतःच्या गाडीतून खाली उतरला आणि त्याने रिक्षाजवळ जाऊन शिवाजी महाराजांच्या रूपातील स्वतःसोबत फोटो काढला. आणि मग तो  पुढच्या प्रवासाला निघून गेला. त्याने हा अनुभव त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला.

खरं  तर अशा ऐतिहासिक, युगपुरुषाची भूमिका करणं हे एक अभिनेता म्हणून तर जबाबदारीचं असतं; पण एक व्यक्ती म्हणूनदेखील खूप आव्हानात्मक असतं. आपण जेव्हा अशी भूमिका करून एखाद्या मालिकेपासून बाजूला होतो त्यानंतरदेखील लोक आपल्याला त्या भूमिकेच्या नावाने ओळखत असतात. ही एक वेगळी जबाबदारी आपल्यावर येत असते . शंतनू सांगतो, “शिवाजी महाराजांची भूमिका मालिकेत जरी संपली असली तरी त्यानंतर माझी ओळख ही शिवाजी महाराजांची भूमिका केलेला अभिनेता अशी चाहत्यांच्या मनात राहते.

तेव्हा मलाही त्याचा नक्कीच आनंद होतो. पण या आनंदासोबत आपण समाजामध्ये कशा पद्धतीने वागले पाहिजे याची एक वेगळी जाणीव होते आणि तोच अनुभव मी ही मालिका संपल्यानंतरही घेत आहे.” गेल्याच आठवड्यात शंतनु त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्यासोबत काही कामासाठी मुंबईतून प्रवास करतहोता. तो स्वतः गाडी चालवत होता तर प्रिया त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती. दरम्यान रस्त्यावरून जात असताना कडेला लावलेल्या एका रिक्षावर शिवाजी महाराजांची एक प्रतिमा होती. दरम्यान त्याची गाडी सिग्नलला थांबली. सिग्नलवरून शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली ती रिक्षा अगदी नजरेच्या टप्प्यात होती. प्रियाने शंतनूला ही गोष्ट सांगितल्यानंतर शंतनूने गाडी सिग्नलपासून बाजूला घेतली . तो गाडीतून खाली उतरला आणि शिवाजी महाराजांमधील स्वतःचे रूप त्यांनी काही क्षण का असेना डोळ्यात साठवून घेतले. शंतनूकडून ती गोष्ट सहजपणे झाली.

त्यामध्ये कुठलाही बडेजाव किंवा सेलिब्रिटी आहे म्हणून प्रसिद्धी मिळवण्याचा आवदेखील नव्हता. त्याच्या मनात शिवाजी महाराजांविषयी असलेली भावना आणि पडद्यावर का असेना पण शिवाजी महाराज काही वेळापुरते त्याला जगता आले याचा अभिमान या दोन्हीची सांगड होती. ही गोष्ट त्याच्या सोशल मीडिया पेजवरून चाहत्यांशी शेअर केली तेव्हा त्याला याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या.

आजही ज्या ज्या कलाकारांनी देवांच्या, युगपुरुषांच्या, समाजातील आदर्श व्यक्तींच्या भूमिका साकारल्या आहेत त्यांच्याविषयी समाजामध्ये एक वेगळा दृष्टिकोन असतो. अनेकदा तर असं होतं की, अशा भूमिका करणाऱ्या कलाकारांना जेव्हा त्यांचे चाहते भेटतात तेव्हा ते या कलाकारांकडे व्यक्तिरेखांच्या रूपाने बघतात. शंतनूने शिवाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर अशाचपद्धतीचे अनेक अनुभव घेतले आहेत. त्याचा नम्रपणा आणि त्याचे शिवप्रेम त्याच्या चाहत्यांनादेखील खूपच आवडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER