ऑक्सिजन, रेमेडिसीव्हरच्या पुरवठ्यावरून ‘ठाकरे’ सरकारचे निर्लज्ज राजकारण – प्रवीण दरेकर

Pravin Darekar - CM Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्राला रेमडेसिवीर (Remdesivir) मिळू नये म्हणून केंद्र सरकारकडून कंपन्यांना धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीका केली. रेमडिसिव्हर व ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्रास करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्विट करून दिली आहे, त्यामुळे ठाकरे सरकारने घाणेरडे राजकारण थांबवून महाराष्ट्राची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर औषधाच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नसल्याचे रेल्वेमंत्री गोयल यांनी आकडेवारीनुसार दाखवून दिले आहे. ठाकरे सरकारने ‘जनाची नाही तर मनाची’ बाळगून या विषयावर चालू केलेले निर्लज्ज राजकारण थांबवावे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली आहे. दरेकर यांनी म्हटले आहे की, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रसायन, खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत ऑक्सिजन, रेमेडिसिव्हर च्या पुरवठ्याबाबत वस्तुस्थिती मांडली आहे. केंद्राने महाराष्ट्राला ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा केल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. देशात क्षमतेच्या ११० टक्के एवढे ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालयाने ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत केंद्रावर आरोप केल्यानेच गोयल आणि मांडवीय यांना ट्विटद्वारे ही माहिती द्यावी लागली आहे.

ठाकरे सरकारने जीएसटी भरपाई आणि लसीकरणाबाबत असेच खोटे आरोप करत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरणाबाबत आकडेवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे सरकारला मुकाटपणे गप्प राहावे लागले. एखादी जबाबदारी पेलवली नाही की सरळ केंद्रावर आरोप करायचे ही ठाकरे सरकारची सवयच आहे. ठाकरे सरकारने आता तरी केंद्रावर खापर फोडण्याचे घाणेरडे राजकारण थांबवावे असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी रेमेडिसिव्हर च्या उत्पादनाबाबत केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय रसायन, खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत मलिक यांना त्या १६ कंपन्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. मलिक यांनी हे आव्हान स्वीकारावे म्हणजे जनतेला वस्तुस्थिती कळेल. मलिक यांनी हे आव्हान स्वीकारावे म्हणजे जनतेला वस्तुस्थिती कळेल. आपण केलेल्या आरोपांबाबत मलिक यांनी पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असेही श्री. दरेकर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button