आमदार असल्याची लाज वाटते; दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करा : शोएब इकबाल

Shoaib Iqbal - Maharashtra Today

नवी दिल्ली :- दिल्लीमध्ये कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णालयांकडून ऑक्सिजन नसल्याची तक्रार केली जात आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र, या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडत नसल्याचे आरोप होत आहेत. यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी. विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार शोएब इकबाल (Shoaib Iqbal) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. काँग्रेससोबतच भाजपाच्याही अनेक ट्विटर हँडल्सवरून हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

पैसा आहे, पण ऑक्सिजन नाही
आमदार शोएब इकबाल यांनी व्हिडीओमध्ये कोरोना परिस्थितीबाबत भावना व्यक्त केली आहे. “आज मला दिल्लीची परिस्थिती पाहून रडू येत आहे. रात्रभर मला झोप येत नाही. लोकांना दिल्लीत ऑक्सिजन मिळत नाही आहे, औषधे मिळत नाही आहे. माझा मित्र यावेळी दिल्लीच्या न्यू लाईफ रुग्णालयात तडफडतो आहे. त्याच्याजवळ ना ऑक्सिजन आहे, ना व्हेंटिलेटर आहे. रात्रीपासून माझ्याकडे औषधांची चिठ्ठी आहे. मी त्याला कुठून रेमडेसिवीर आणून देऊ? देव करो आणि त्याचे काही बरं-वाईट न होवो. मुली रडत आहेत. सगळे आहे, पैसा आहे, पण औषधे, ऑक्सिजन मिळत नाही आहेत.” असे शोएब इकबाल यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

…तर रस्त्यांवर प्रेतं दिसतील
“मला आज आमदार असण्याची लाज वाटत आहे. आम्ही कोणाच्या मदतीला उपयोगी पडू शकत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी. फार गंभीर परिस्थिती आहे, असे झाले नाही तर रस्त्यांवर प्रेतं दिसू लागतील.” असे शोएब इकबाल म्हणाले. दरम्यान, यानंतर भाजपा आणि काँग्रेसकडून दिल्ली सरकारवर टीका होत आहे. गोवा काँग्रेसनेही व्हिडीओ ट्विट  करत दिल्ली सरकारवर निशाणा साधला आहे.

त्याचबरोबर, भाजपा आमदार अजय महावार आणि आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. “ ‘आंदोलनजीवीं’साठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) अवघ्या काही तासांमध्ये वायफाय, वीज पुरवठा उपलब्ध करून देऊ शकतात, तर मग आप आमदार शोएब इकबाल यांना आपल्याच मुख्यमंत्र्यांवर कोरोना परिस्थिती हाताळण्याबाबत विश्वास कसा नाही?” असा सवाल मालवीय यांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button