…तर आज शाहबाज अहमद सनरायझर्सच्या संघात असता?

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) बुधवारी केवळ १४९ धावांचे रक्षण करत सनरायझर्सविरुद्ध (SRH ) ६ धावांनी विजय मिळवला. या विजयात ४१ चेंडूंत ५९ धावांची खेळी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल याला सामनावीर ठरविण्यात आले असले तरी आणखी एक जण सामनावीर पुरस्काराचा हक्कदार होता, तो म्हणजे शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed). त्याने फक्त ७ धावात ३ गडी बाद करून गोलंदाजीत चमक तर दाखवलीच; शिवाय विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला फलंदाजीत तिसऱ्या क्रमांकावर खेळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मॅक्सवेल- डीविलियर्स यांच्याही पुढे विराटने त्याला खेळवले आणि त्याने १० चेंडूंत १४ धावा केल्या. हाच शाहबाज गेल्या वर्षी वेळीच ट्रायलला गेला असता तर कदाचित आज आरसीबीच्या नव्हे तर सनरायझर्सच्या संघात असता.

शाहबाज हा टी-२० च नाही तर प्रथम श्रेणी व लिस्ट ए सामन्यातही कधी तिसऱ्या क्रमांकावर खेळलेला नव्हता. अशा एकूण ५९ सामन्यात तो पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि त्याच्या १४ धावा ही त्याची टी-२० सामन्यातील सर्वोच्च खेळी ठरली. त्याची आधीची सर्वोच्च खेळी १३ धावांची होती.

हरियाणातील मेवात गावचा हा खेळाडू. २०१९-२० चा रणजी सिझन त्याने गाजवला होता. त्यावेळी बंगालसाठी सातव्या क्रमांकावर खेळताना त्याने त्याने ३६.३५ च्या सरासरीने ५०९ धावा केल्या होत्या. यावेळी बहुतेक डाव संघ संकटात असतानाचे होते आणि त्यात त्याने संघाचा पराभव तर टाळलाच, काही सामन्यांत विजयसुद्धा मिळवून दिला होता. फलंदाजीत ५०९ धावा करण्याशिवाय गोलंदाजीतही १६.८० च्या सरासरीने ३५ गडी बाद करत त्याने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यास तो अतिशय उत्साहित होता पण कोरोना लाटेमुळे आयपीएल २०२० चक्क सहा महिने लांबले. या सहा महिन्यांच्या काळात तो घरी केवळ बसून होता. आयपीएल वेळेवर झाले असते तर रणजीतील ह्याच यशस्वी फॉर्मचा त्याला फायदा झाला असता; पण जे काही होईल ते चांगलेच होईल, असे विचार आपण ठेवल्याचे तो सांगतो. आणि वर्षभरानंतर आता सनरायझर्सविरुद्ध संधी मिळाली ती दोन्ही हातांनी घेत तो चमकला आहे.

योगायोगाने २०२० च्या आयपीएलसाठी याच सनरायझर्सने त्याला ट्रायलसाठी बोलावले होते; पण दोनच दिवसांत रणजी सामना असल्याने शाहबाज त्या ट्रायलला गेला नव्हता. गेला असता तर कदाचित आज तो सनरायझर्सच्या संघात असता. आता त्याच सनरायझर्सविरुद्ध १० चेंडूंत १४ धावा आणि फक्त ७ धावात ३ महत्त्वाचे बळी अशी कामगिरी त्याने केली आहे.

डावाच्या १५ व्या षटकात विराटने त्याच्या हाती चेंडू सोपवला आणि आपल्या दुसऱ्याच षटकात त्याने जाॕनी बेयर्स्टो, मनीष पांडे व अब्दुल समद यांना बाद केले. त्यामुळेच १५० धावांच्या लक्ष्याकडे सहज वाटचाल करणाऱ्या सनरायझर्सची गाडी २ बाद ११५ वरून ५ बाद ११५ अशी घसरली आणि शेवटी १४३ धावांवरच ते मर्यादित राहिले. त्याच्या ह्या एका षटकाने सामन्याचा नूर पालटला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button