धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूरकरांची पाण्यासाठी पायपीट

Shahapur taluka of dams faces water crisis

शहापूर: कोरोना आणि अस्मानी संकटांसोबतच आता पाणी टंचाईच्या संकटानेही गरिबांना घेरले आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर व कसारा भागातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील शहापूर , कसारा माळ, विहीगाव, ढेंगणमाळ, सुसरवाडी, वशाळा, साठगाव, आपटे गावासह २२० गावपाड्यांवर भीषण पाणी टंचाई आहे.

विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. विशेष म्हणजे या भागात चार मोठी धरणं आहेत. पाणी डोळ्याने दिसतंय पण प्यायला मिळत नाही. धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी अवस्था या गावकऱ्यांची झाली आहे. नेतेमंडळींचे अनेक दौरे या भागात होत असतात. अनेक आश्वासने दिली जातात. परंतु ही आश्वासने पूर्ण मात्र कधी झाली नाहीत, अशी गावकऱ्यांची भावना आहे. एवढा भीषण दुष्काळ पाहूनही प्रशासन वर्षानुवर्ष झोपेचं सोंग का घेत आहे? असा सवाल गावकरी करत आहेत.

शहापूर तालुक्यात जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागल्याने तालुक्यातील २२० गावपाड्यांवर फक्त ३५ टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे काही गावपाड्यांना दोन-तीन दिवसाआड टॅंकरने पाणी मिळते. तर काही गावपाड्यांना टँकरचे पाणीदेखील मिळत नाही.

त्यामुळे पाणी आणण्यासाठी येथील महिला तीन-चार किलोमीटर जीव धोक्यात घालून डोंगराळ भागातून खाली उतरतात. तसेच रेल्वे रूळ व महामार्गावरून पायपीट करतात. धरणांचे गाव असले तरी घोटभर पाण्यासाठीदेखील शहापूरकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी रात्रभर येथील महिला रांगा लावून बसलेल्या असतात. दगडाच्या फटीतून झऱ्याप्रमाणे थेंब-थेंब पाणी साचल्यावर ते पाणी वाटीने भरले जाते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER