शाहरुख खानचा ‘पठाण’ पुढील वर्षी होणार रिलीज

शाहरुखने जानेवारीपासून ‘पठाण’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. यशराज बॅनर अंतर्गत तयार होत असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन सुपरहिट ‘वॉर’सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करीत आहे. या सिनेमात शाहरुखच्या नायिकेच्या भूमिकेत दीपिका पदुकोण असून जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारीत आहे. पठाणचे शूटिंग सुरु करण्यापूर्वी शाहरुखने एक व्हीडियो रिलीज करून तो यावर्षी त्याच्या फॅन्सना रुपेरी पडद्यावर दर्शन देणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून पठाण यावर्षी रिलीज केला जाणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुखचा हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार नसून पुढील वर्षी रिलीज केला जाणार आहे. यशराजनेही काही दिवसांपूवी यावर्षी रिलीज केल्या जाणाऱ्या 5 सिनेमाची नावे जाहीर केली त्यात ‘पठाण’चे नाव नव्हते. त्यामुळे ही बातमी खरी असल्याचे दिसत आहे.

मात्र ‘पठाण’ यावर्षी रिलीज होणार नसला तरी शाहरुख खान त्याच्या फॅन्सना रुपेरी पडद्यावर दर्शन देणार आहे. आणि त्याचा यावर्षी रिलीज होणाऱ्या सिनेमाचे नाव ‘रॉकेट्री’ असून अभिनेता आर. माधवनने याचे दिग्दर्शन केले आहे. देशभक्तीने भरलेल्या या सिनेमात भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इसरो)मधील एका शास्त्रज्ञाची गाथा मांडण्यात आलेली आहे. या शास्त्रज्ञाचे नाव आहे नंबी नारायणन. आयव्ही लीगमधील यूनिर्व्हसिटीमध्ये प्रवेश करणारे ते पहिले भारतीय होते. अमेरिकन अंतराळ संस्था नासात नोकरीची संधी आलेली असतानाही ती नाकारून नंबी नारायण भारतात आले. येथेच त्यांनी स्वदेशी रॉकेट इंजिन तयार केले. त्यांच्यावर देशाविरोधात हेरगिरी केल्याचा आरोपही झाला होता. याचा त्यांना खूप त्रास झाला होता. त्यांची ही कथा आर. माधवन पडद्यावर आणत असून माधवनच त्यांची भूमिका करीत आहे. दुसऱ्या एका महत्वाच्या भूमिकेसाठी शाहरुख खानला घेण्यात आलेले आहे. शाहरुख ‘रॉकेट्री’च्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सिनेमात काम करीत असून तामिळमधील सिनेमात सुपरस्टार सूर्याने काम केलेले आहे. हा सिनेमा यावर्षी रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER