
शहाजहाँ ज्यानं ताजमहाल बांधला त्या बादशाहाचे अनेक आश्चर्यकारक किस्से प्रसिद्ध आहेत. शहाजहाँनची मुलगी ‘जहानारा’ला (Shah Jahan daughter Jahanara) त्यावेळी खरेदीचा भरपूर छंद होता. मुलीची छंद पुर्ण व्हावा म्हणून या बापानं दिल्लीत अक्खी बाजारपेठ वसवली, ज्याला आजही लोकं चांदणी चौक (Chandni Chowk Bazaar) या नावानं ओळखतात. याला आणखी एक कारण होतं की मुलीला खरेदीसाठी जास्त दुर जाऊ लागू नये. एकाच ठिकाणी सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून त्याने हा निर्णय घेतला.
चांदणी चौक नाव का पडलं?
दिल्लीतला प्रसिद्ध चांदणी चौक हा आजकालचा नसून मुघलांच्या काळापासून तो चालत आलाय. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा शहाजहाँ दिल्लीच्या गादीवर होता आणि भारतावर त्याचा अंमल होता. ताजमहालासह त्यानं दिल्लीत नव नव्या गोष्टी उभारल्या. बाजारपेठा वसवल्या त्यापैकीच एक चांदणी चौक.
शहाजहाँनची मुलगी जहानारा बेगम हिच्यावर प्रचंड जीव होता. मुलीच्या आनंदासाठी त्याची वाट्टेल ती करायची तयारी होती. जहानाराला खरेदीची दांडगी हौस होती. ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खरेदी करायची. यावर उपाय म्हणून शहाजहाँनं विचार केला की नवी बाजारपेठ बनवावी. जिथं एकाच ठिकाणी जहानाराला प्रत्येक गोष्ट खरेदी करता येईल. त्याने तातडीनं संबंधीत मंत्र्याच्या कानावर हा विषय घातला आणि कामाला सुरुवात झाली.
१६५० ला या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. त्याच्या समोर आराखडा आला, या बाजाराला काय नाव ठेवावं या गोष्टीवर मसलती सुरु होत्या. चौरस आकारात बाजाराची मांडणी करण्या आली. काही महिन्यातच बाजार पेठेच्या बांधकामाच काम पुर्ण करण्यात आलं.
व्यापाऱ्यांना बाजारात स्थान मिळाल्यानंतर त्यांनी बाजारात हरएक गोष्टीला स्थान दिलं. काही आठवड्यातचच चांदणीचौक बाजार प्रसिद्धीस पावला. इतका की आता इराण, इराक, अफगाणापासूनचा माल या बाजारात येऊ लागला. चांदणी चौक यमुनेच्या काठी होता. त्यामुळं रात्री चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश यमुनेच्या पाण्याला काही वेगळीच रौनक आणायचा. यामुळं बाजाराचं नाव चांदणी चौक बाजार असं ठेवण्यात आलं.
चांदणी चौकातली चांदी होती जगप्रसिद्ध
बाजार वसवल्यानंतर लहान मोठे व्यापारी बाजार पेठेच्या दिशेनं आकर्षित झाले. सुरुवातीला लहान- मोठे व्यापारी इथं व्यवसायासाठी आले पण नंतरच्या काळात बाजारानं मोठं रुप घेतलं. चांदणी चौक बाजार प्रसिद्धीस पावला. लोकांची तौबा गर्दी खरेदीसाठी तिथं होऊ लागली.
लोकांची गर्दी आणि बाजाराला मिळत असलेला प्रतिसाद बघून अनेक चांदीचा व्यापार करणारे व्यापारी या बाजाराकडे खेचले गेले. पुर्ण भारतातून या ठिकाणी व्यापारी चांदी विकायला येऊ लागले. अनेकांना वाटायचं की चांदीमुळंच या बाजाराच नाव चांदणी चौक पडलंय.
तुर्कीस्तान, चीन ते पार हॉलंडपासून अनेक व्यापारी इथं यायचे. या बाजारतल्या दरिबा कलेतील दागिन्यांना अधिकची मागणी होती.
चांदणी चौकातल्या बाजाराला नंतरच्या काळात वेगवेगळ्या हिश्श्यात विभागलं गेलं. यात प्रमुख चार हिस्से होते. ते होते उर्दू बाजार, जोरही बाजार, अशरफी बाजार आणि फतेहपुरी बाजार. जवळपास १.३ किलोमीटरमध्ये परसलेल्या या बाजारात त्याकाळी १५०० दुकानं होती. ज्यात गरजेची प्रत्येक वस्तू सहज उपलब्ध होत असे. मुघल शासकानं जरी चांदणी चौक वसवला असला तरी सर्व जाती धर्मातील लोकांची दुकान होती.
१७ व्या शतकापासून चांदणी चौक बाजार महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. भारताची ओळख मसल्यांसाठी जगभरात होती. मसाल्यांचाही मोठा व्यापार चांदणी चौकात होत असे. जे नाव घ्याल तो मसाला इथं मिळायचा. सर्व मसाले एकाच ठिकाणी मिळतील असा एकमेव बाजार म्हणून चांदणी चौक बाजारानं ओळख मिळवली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला