आहारात षड्रस क्रम त्यामागील शास्त्रविचार

Shadras - Maharashtra Today
Shadras - Maharashtra Today

भारतीय आहार पद्धती ही आरोग्याचा विचार करून केलेली आहे यात शंका नाही. सहा रसयुक्त आहार असावा हा सिद्धांत अगदी सहजपणे पूर्ण होतो. कोणत्याही पोषक घटकांची कमतरता येऊ नये याकरीता षट् रसयुक्त आहार अग्निचा विचार करून घेतल्यास फलदायी ठरतो. काही काळापासून अनेक देश प्रांताच्या आहार संस्कृतीची सरमिसळ होत चालली आहे त्यामुळे बराच बदल जाणवतो आहे. सहा रसांचा क्रम सुद्धा आयुर्वेद ग्रंथांमधे वर्णित केला आहे.

पूर्वं मधुरं अश्नीयाद् मध्ये अम्ल लवणौ रसौ ।
पश्चात् शेषान् रसान् वैद्यो भोजनेषु अवचारयेत् ॥

आहार सेवन करतांना प्रायः सुरवात मधुर रसाने करावी. त्यानंतर अम्ल लवणरसयुक्त आहार घ्यावा. शेवटी तिखट कडू तुरट रसयुक्त पदार्थ घ्यावे. सुरवात गोडाने करायची ? कसे काय ? डेझर्ट शेवटी घ्यायचा असतो! असे अनेक पश्न पडले असतील हे सूत्र वाचून. परंतु त्यामागचा विचार समजून घेतला की सोपं वाटेल. भूक लागली म्हणजे अग्नि तीव्र होते. मधुर रस पचायला जड असल्याने तो सुरवातीला घेतल्याने पचायला मदत मिळते. रोज गोड पदार्थ आपण घेतोच असे नाही. म्हणूनच जेवणाची सुरवात तूप भातवरण अशी केली जाते. हे मधुर रसाचे स्निग्ध भोजन आहे.

या मधुर रसानंतर अम्ल लवण रसयुक्त तिखट कडू कषाय ने समाप्ती करावी. वरणभातानंतर आमटी ( अम्ल) हिंग मिरे मेथी युक्त भाजी याचे सेवन केले जाते. त्यामुळे आपोआप सहा रसांचा क्रम पाळल्या जातो. भोजनान्ते तक्रं असे म्हटल्या जाते. भोजनाच्या शेवटी काय घ्यावे तर ताज्या दह्याचे पातळ असे ताक. हे आंबट तुरट रसाचे असते. आ.सुश्रुत मतानुसार उष्णकटिबंधातील आहाराच्या दृष्टीने हा क्रम योग्य आहे.

परंतु ज्यांना मंदाग्नि ( भूक न लागणे किंवा उशीरा पाचन होणे) अग्निमांद्य, आमविकार असेल तर भोजनाच्या सुरवातीला लवण रसात्मक मीठ व तिखट रसात्मक आलं याचा उपयोग फायदेशीर ठरतो. या आलं मीठाच्या मिश्रणाने जाठराग्नि चांगली होते. पाचन मुखजिव्हा शुद्ध होते व जेवण करण्याची इच्छा होते. कंठ शुद्ध व कफनाश होण्यास मदत होते.

भोजनाग्रे सदा पथ्यं लवणार्द्रकभक्षणम् ।
अग्नि सदीपनं रुच्यं जिह्वाकण्ठविशोधनम् ॥

हे नियम आहेत पण एखादेवेळी काही कारणाने किंवा भोजनाचा बेतच तिखट, मसालेयुक्त, दाह उत्पन्न करणारा असेल तर या विदाह शमन करण्याकरीता शेवटी मधुर रसाचे पदार्थ सेवन करावे. विशेषतः मांसाहारानंतर मधुर रसयुक्त काहीतरी खावे. जेणेकरून वात पित्त कफ दोषांचा समतोल बिघडणार नाही.

लवणाम्लकटु उष्णानि विदाहीनि यानि तु ।
तत् दोषं हतं आहारं मधुरेण समापयेत् ॥

किती सर्वांगिण विचार आपल्या आयुर्वेद (Ayurveda) शास्त्रात आहे बघा. दोष प्रकोप होणार नाही व देहाचे पोषण होईल याकरीता नियम सांगितला पण यदा कदाचित पाचन मंदावले किंवा रसक्रम बदलला तर त्याचीही काळजी घेतली व नियम सांगितले. या आयुर्वेदाच्या सूत्रांचा आहार सेवन करतांना विचार लक्षात घेतल्यास नक्कीच स्वास्थ्यरक्षण होऊ शकेल.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button