शाळेपासून मुक्ती…. वर्षापुरती

Shadepasun mukti

सध्याच्या ऑनलाईन शिक्षणाच्या (Online Education) काळात त्याबाबतचे अनेक फायदे तोटे याची चर्चा होते आहे. असे असले तरी त्याच्या नकारात्मक बाजूच जास्त डोळ्यासमोर येतात. त्याला पर्याय म्हणून होम स्कूलिंग चा पर्याय डोळ्यासमोर आला .हे सगळं सुरू असताना माझ्या वाचनात एक पुस्तक आलं. ते ॲक्च्युअली कोणीतरी माझा मुलगा छोटा असताना त्याला गिफ्ट दिलेलं पुस्तक होतं. पण आता ते विशेष करून वाचावसं वाटलं ,कारण पुस्तकाचं नाव आहे ,”शाळेपासून मुक्ती वर्षापूरती ! (Shadepasun Mukti…varshapurti) “लेखक राहुल अल्वारिस (Rahul Alwaris) . शाळेत न जाता एका वर्षात या मुलाने केलेले अनेक उत्तम प्रोजेक्ट पाहून मन थक्क झाले. अनुक्रमणिका वाचतानाच त्या भन्नाट प्रोजेक्टची धावती ओळख झाली आणि अशा वेळी आपल्या मुलांना आपोआपच या निमीत्ताने मिळालेली शाळेपासूनच्या मुक्ती मध्ये असे सकारात्मक किरण दिसू लागले आणि या उत्सुकतेने मी ते पुस्तक वाचायला घेतले.

केवळ वयाच्या सोळाव्या वर्षी एका मुलाने लिहिलेले हे पुस्तक आहे . वयाच्या सोळाव्या वर्षी आणि चक्क पुस्तक लिहिण !खरंतर आपल्या शिक्षण पद्धतीनुसार या वयातील मुलांनी ,मोठ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा फक्त अभ्यास करायचा. म्हणजे ती वाचून घोकायची आणि परीक्षेत उतरवायची . अशा वयामध्ये दहावी पास झाल्यानंतर इतर मुलांप्रमाणे शाळेत न जाता मन मानेल त्या गोष्टी करायच राहुलने ठरवले. राहुल आपल्या नायकाचं नाव. शाळेपासून मुक्ती ही त्याच्या शाळेबाहेर व्यतीत केलेल्या एका वर्षाची गोष्ट आहे. समवयीन मुला-मुलींना शाळा कॉलेजमधल्या निर्जीव शिक्षणापासून दूर जाता यावं, आयुष्याची आणि शिक्षणाची दुसरी जीवंत बाजू अनुभवायची संधी मिळावी म्हणून त्यांना हे पुस्तक लिहिले आहे. आणि त्याच्या अनुभवानुसार या त्याने गमावलं काहीच नाही उलट कमावलं पुष्कळ असं तो म्हणतो. आणि म्हणूनच आगळीवेगळी कहाणी,व विषय असलेलं हे पुस्तक तुमच्या समोर मांडावे असे वाटले. सद्य परिस्थितीमध्ये याचा उपयोग करून आपण मुलांसाठी नक्कीच काही तरी करु शकू.

आपला छोटा लेखक सांगतो की, शाळेतून बाहेर पडलो तेव्हा मी किती कच्च मडक होतो, याची तुम्हाला कोणाला कल्पना येणार नाही. त्याने कधी एकट्याने प्रवास केला नव्हता .आगगाडीचे तिकीट कसे घ्यायचं हे त्याला माहीत नव्हतं .त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे फक्त आई-वडिलांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर प्रवास करायचं एवढंच त्याला माहिती होतं. ठरवणे ,निर्णय घेणे यापैकी कुठलाच अनुभव त्याच्यापाशी नव्हता. जवळ पैसे ठेवण्याचा देखील अनुभव नव्हता. तेव्हा दूरच्या प्रवासाचे स्वप्न पाहत असताना त्याच्या आईवडिलांनी ठरवलं की आपला आपण व्यवहार कसा करायचा हे ठरवण्यासाठी गोव्यातल्या गोव्यात राहूनच त्याने स्व अनुभवातून सुरुवातीला शिकायला लागेल.
म्हणून म्हापश्याच्या एका मत्स्यालय दुकानात ,मदतीला म्हणून तो जायला लागला. या माशांच्या अद्भूत जगाची ओळख खरंतर वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्याची झाली होती. ते दुकानदार त्याच्या वडिलांचे मित्र होते. लेखक दररोज सकाळी नऊ वाजता वेळेत पोचण्यासाठी वेगाने सायकल दाम टवत दुकानात जात असे आणि दुपारपर्यंत पडेल ते काम करत असे. पहिले काही दिवस दुकानातलं काम करताना, माशांच्या काचेच्या पेटीवर लक्ष ठेवायचं ,ते स्वच्छ करायचे .मेलेले मासे काढून टाकायचे .अशी किरकोळ कामे तो करायचा .नंतर मग जखमी आजारी माशांवर उपचार करायला लागला. नंतर त्याने मत्स्यालय बनवण्यासाठी एका घराची ऑर्डर होती तिथे जाऊन काचेचा हौद कुठे चांगला दिसेल? तिथे प्रकाशयोजना कशी असावी ?अशी माहिती व्यवस्थित दिली. थोडक्यात मार्केटिंगचा म्हणाना ! नंतर मग गुप्तपणे माशांच्या खाद्याच्या बाजारातील किमतीची माहिती मिळवण्याच्या कामगिरीवर त्यांनी त्याला पाठवण्यात आलं. त्यातील काचेचा मत्स्यालय बनवायला शिकणे हे त्याला फारच रंजक वाटलं. त्यातील बारकावे त्यांनी शिकून घेतले .एवढेच नव्हे तर त्याचं मेंटेनन्स कामही त्यांनी शिकून घेतलं. याव्यतिरिक्त अनेक छोटी कामे म्हणजे बँकेची कामे तिथे असताना शिकला. हे शिकत गेल्यामुळे वेळेचे नियोजन करणेही शिकत गेला आणि त्यामुळे आपले छंद जोपासणे जमू लागलं. याच काळामध्ये त्यांनी अनेक पुस्तके आणि त्यांच्या मालिका वाचून संपल्या त्याचप्रमाणे गाणी ऐकली. त्याच दरम्यान दहावीचा रिझल्ट लागला तो यशस्वी झाला आणि दहावीच्या परीक्षा नंतर एक वर्ष सुट्टी घ्यायच्या त्याच्या निर्णयाबद्दल त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याची पाठ थोपटली त्यांना खूप आनंद झाला.

हे खूप महत्त्वाचा मला वाटतंय .कारण असा निर्णय प्रत्यक्षात जर कोणी घेत असेल तर ही वेगळी वाट चोखाळतांना, परावृत्त करणारे लोक जास्त भेटतात.

त्यानंतरचा उपक्रम होता घराच्या ईशान्य दिशेला दूर असलेल्या एका खेड्यांमध्ये शेतावर कामाचा अनुभव घ्यायचा होता .रस्तिक फार्म येथे त्याचा जन्म झालेला होता. त्यामुळे तिथेच काम करायचं त्यांनी ठरवलं. पण ते काही कारणाने शक्य झालं नाही मग स्वतःच्याच खेड्यात,” पर्‍याला “शेतीविषयक मूलभूत गोष्टी शिकून घेतल्या. त्यात नांगर चालवणे हे अनुभव घेतले. सर्वसामान्य गोवेकरांना वनस्पतीविषयी फार प्रेम आहे. तिकडे भरलेल्या वनस्पतींच्या प्रदर्शनासएका ठिकाणी लेखकाने प्रेक्षक म्हणून सहभाग घेतला .तर दुसऱ्या ठिकाणी सक्रिय सहभाग होता. तेथे विशेषतः सेंद्रिय शेती या विषयावरचं भाषण त्यांना खूप आवडलं आणि त्याचे त्यांनी खूप प्रश्नही विचारून माहिती ही मिळवली .पुढच्या सिओलिम या प्रदर्शनात म्हणजे ग्रीन हेरिटेज येथे त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रदर्शनाच्या ठिकाणी साहित्य गोळा करून आणत आणि परत प्रदर्शन संपल्यावर प्रत्येकाच्या घरी पोचवणं हे महत्त्वाचं काम होतं .या कार्यक्रमाचे तीन भाग होते एक म्हणजे प्रदर्शन, दुसरे भाषण, तिसरा वनस्पती जगाशी संबंधित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा. प्रदर्शनाची मांडणी कशी केली जाते हे लेखक शिकला. याठिकाणी भाज्यांवरील कोरीव काम ,जाम आणि फळांचे रस बनवणे, वाईन बनवणे आणि काकटस या विषयावरील भाषणे ऐकली. प्रदर्शनाच्या या तीन दिवसांमध्ये अगदी छोट्या छोट्या कामांचा अनुभव घेतला.

याशिवाय आळंबी कशी वाढवायची ? त्याचे महत्त्व कसे सांगायचे? त्याची सविस्तर माहिती त्याच्यावरच्या किडी-रोग ,त्याचप्रमाणे केरळला सहलीला जाऊन सेंद्रिय शेती वरील एका चर्चासत्राला उपस्थित राहणे ,त्याच्यासाठी एकटा प्रवास करणे, तसेच जिवंत सापाच्या दुनियेमध्ये सफर म्हणजे पुण्याच्या सर्पोद्यानात चे संचालक यांच्याशी संपर्क करून पुढील अनुभवांसाठी लेखक तिथे गेला. तेथील खैरे काकांच्या अनुभवावरून त्याने कामगारांना त्यांच्या कामात मदत करायला सुरुवात केली .सापांबद्दल माहिती मिळवण्याचा तोच एक उपाय होता. सापांना हाताळायला देखील लेखक शिकला .तेथील मुक्कामात अनेक प्रकारचे अनुभव त्याने घेतले .उद्यानातील लोकांना सापांची माहिती देण्याचे कामही त्यानी केले. याशिवाय

साप चावल्यावर करायचे प्रथमोपचार याचीही माहिती त्यानी घेतली.
याच्यानंतरचा अनुभवाचा विषय होता गांडूळ यांसंबंधी. लेखकाने गांडूळ जगतावर अनेक पुस्तके वाचली, गांडूळाच्या विविध प्रकारांचा हालचालींचा, सवयींचा, रंग ,वैशिष्ट्य यांचा अभ्यास प्रत्यक्ष निरीक्षणातून केला. गांडूळ बेड, खड्डे यांचाही बनवण्याचा अभ्यास केला ,त्यासाठी मातीची सच्छिद्रता, आर्द्रता ,पोत यासारख्या गोष्टी पण शिकल्या.

त्यानंतर कोळी, क्रोकोडाइल यासारख्या ही प्राण्यांची सविस्तर माहिती आणि जोपासना त्यांनी शिकली. त्यानंतर मार्गदर्शनासाठी त्याला आमंत्रण यायला लागली. अनौपचारिक अनुभव एका वर्षात किती घेता येतं याचा उत्तम नमुना,आणि तोही धावता आढावा ! एक उदाहरण म्हणून हे पुस्तक खूप काही सांगून जाते.

केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षण काय काय देऊन जाऊ शकते याचा वास्तव नमुना म्हणून याकडे बघता येईल. सगळ्यांनी हेच करावं असं नाही पण या प्रकारच्या अनेक गोष्टी आपण मुलांसाठी करू शकतो, करवून घेऊ शकतो. यातही लेखकाच्या वडिलांनी वेळोवेळी विविध ठिकाणी संपर्क करून विविध ज्ञानाची ठिकाणं उपलब्ध करून देण्यासाठी मदत केलेली दिसते. आणि मुलं तर अशा गोष्टींसाठी उत्सुक असतातच. आपणच त्यांना बंद खोल्यांमध्ये गॅजेट्स च्या आहारी जायला भाग पाडतो का? हा प्रश्न पण सगळे स्वतःला विचारू शकतो. सध्य परिस्थितीत अतिशय विचार करण्यासारखा अनुभव आहे हे निश्चित !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER