विद्यर्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणात ४ आश्रमशाळांची मान्यता रद्द

Rape

मुंबई : राज्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यर्थिनींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात शासनातर्फे कडक पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थिनींवरील अत्याचारप्रकरणी ४ आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या पाळा (जि. बुलडाणा), माकरधोकडा (जि. गोंदिया) तसेच सामाजिक न्याय विभागामधील उंब्रज (जि. सातारा), सिंदफणा (ता. शिरूर, जि. बीड) या आश्रमशाळांचा समावेश असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

अशाप्रकारच्या घटनांमुळे राज्यातील सर्वच आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षेविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचा मुद्दा हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या वेळी त्यांनी विद्यार्थिनींवर होणारे अत्याचार तसेच गैरसोयीच्या घटना लक्षात घेता राज्यातील सर्व आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी केली होती का, अशी विचारणा केली. राज्य महिला आयोगाकडून अशी काही मागणी करण्यात आली नव्हती, असे सावरा यांनी या वेळी स्पष्ट केले.