लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेचे लैंगिक शोषण

जयभवानीनगरातील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

Rape

औरंगाबाद : पतीला फारकत दे मी तुझ्याशी लग्न करुन मुलाबाळांना सांभाळतो असे आमिष दाखवत जयभवानीनगरातील तरुणाने विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन चंद्रकांत कुंटलगारलू (२५, रा. घर क्र. एफ-४०, जयभवानीनगर, कामगार चौक, एन-४, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा हर्सुल पोलिस शोध घेत आहेत.

पिसादेवी रोडवरील एका २७ वर्षीय विवाहितेचा पती भारतीय सैन्यदलात एक वर्षापासून जम्मू-काश्मिर येथे कार्यरत आहे. या विवाहितेला एक मुलगी व मुलगा आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये विवाहितेची धाकटी बहिण नृत्याची शिकवणी घेत होती. त्यावेळी तिच्याकडे शिकवणीच्या कामासाठी येणा-या सचिन गायकवाड याच्यासोबत रोहन कुंटलगारलू हा यायचा. याकाळात एकदा शिकवणीच्या कामासाठी आलेल्या सचिन गायकवाडला विवाहितेच्या बहिणीने आगाऊ पैसे आणण्यासाठी सांगितले होते. तेव्हा रोहन देखील त्याच्यासोबत होता.

त्यावेळी विवाहितेची त्याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर विवाहिता व रोहन अधून-मधून भेटू लागले. विवाहितेची बहिण शिकवणीला गेल्यावर रोहन घरी यायचा. त्यामुळे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने पतीला फारकत दे मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणाला. मात्र, विवाहितेने त्याला नकार दिला. पण त्याने जवळीक साधत डिसेंबर २०१९ पासून वेळोवेळी विवाहितेशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

पतीने हाकलले घराबाहेर : मार्च २०२० मध्ये विवाहितेचा पती एक महिन्याच्या सुटीवर आला. तेव्हा त्याला पत्नी व रोहनच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली. त्यामुळे त्याने विवाहितेला घराबाहेर हाकलून लावले. हा प्रकार विवाहितेने रोहनला सांगितला. त्यानंतर देखील त्याने पतीला फारकत दे मी तुझ्याशी लग्न करतो असे आश्वासन दिले. त्यामुळे विवाहिता पतीला सोडून आई-वडिलांकडे राहायला गेली.

अन् रोहन झाला पसार : २६ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास रोहनने तिला स्वत:च्या घरी नेले. त्यावेळी देखील त्याने पतीला फारकत दे मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणाला. त्यामुळे विवाहितेने पतीला फारकत देते असे म्हणाली. त्यानंतर रोहनने तिला दोन-तीन दिवसात लग्न करु असे आश्वासन दिले. मात्र, २७ मे रोजी रोहन तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणत घरातून पळून गेला. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी देखील विवाहितेला घराबाहेर हाकलून दिले. याप्रकारानंतर अखेर विवाहितेने हर्सुल पोलिस ठाणे गाठत रोहनविरुध्द अत्याचाराची तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER