अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामास सात वर्ष सक्तमजुरी

minor-girl

औरंगाबाद : पाणी पिण्याच्या बहाण्याने मुलीच्या घरात जाऊन तिला घरातून उचलून नेत अत्याचार केल्याप्रकरणी लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार आरोपीस सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.  प्राप्त माहितीनुसार,अय्युब मोहंमद पटेल असे आरोपीचे नाव आहे.

सिल्लोड तालुक्यातील अल्पवयीन मुलगी १४ नोव्हेंबर २०१५ रोजी घरी एकटीच होती. तिचे आई-वडील शेतात गेले होते. दरम्यान अय्युब मोहंमद पटेल (वय ३३, ता. सिल्लोड) हा पाणी पिण्याच्या बहाण्याने आला. पाणी पिल्यानंतर तो सरळ घरात शिरला आणि त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रतिकार केल्याने तिचे तोंड दाबून अय्युबने तिला कडेवर उचलून त्याच्या घरात नेले. तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करून तो पळून गेला. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अय्युब पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलींद खोपडे यांनी तपास करून अय्युब पटेल यास अटक केली. याप्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीदरम्यान सहाय्यक लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये अल्पवयीन मुलगी, तिचे आई वडील आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीस सात वर्षे सक्त मजुरी, पाचशे रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अॅड. बागूल यांना तपास अधिाकरी मिलींद खोपडे, व्ही. एस. सोनवणे, पैरवी अधिकारी व्ही. एस. यमपुरे, आर. सी. आगे, एस. बी. वाघ यांनी सहाय्य केले.