कोरोनासाठी राज्यात आपात्कालीन रुग्णालये उभारा : अतुल शहा

CM uddhav Thackeray - Atul Shah

मुंबई : कोरोनो विषाणूने चीनमध्ये घातलेले थैमान बघता, भविष्यात अशी आपत्ती ओढवल्यास महाराष्ट्राने तयार राहिले पाहिजे. त्यादृष्टीने राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अद्ययावत आणि आपात्कालीन इस्पितळे उभारण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन ही इस्पितळे तातडीने उभारावीत, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते, माजी आमदार आणि मुंबईचे नगरसेवक अतुल शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अतुल शहा यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला जागतिक संकट घोषित केले आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी चीनने केवळ १५ दिवसांत रुग्णालय बांधले, याकडे शहा यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे. रुग्णावर त्वरित उपचार करण्यासाठी आपल्याकडेही आपात्कालीन व्यवस्था म्हणून चार शहरांमध्ये अशा रुग्णालयांची गरज आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.