
मुंबई : गीतकार आणि चित्रपटांचे पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवर महानगर दंडाधिकार्यांनी सुरू केलेली बदनामीच्या फौजदारी खटल्याची कारवाई आणि त्यात आपल्याला काढलेले समन्स रद्द करावे यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिच्या अर्जावर दिंडोशी येथील सत्र न्यायालय उद्या सोमवारी निकाल देणार आहे.
कंगनाच्या फेरविचार अर्जावर (Revision Application) शनिवारी सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. बघले यांनी निकाल राखून ठेवला.
कंगनाच्यावतीने युक्तिवाद करताना अॅड. रिझ्वान सिद्दिकी यांनी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम २०० चा हवाला देत सांगितले की, या कलमानुसार आरोपीला समन्स काढण्यापूर्वी दंडाधिकार्यांनी फिर्यादी व त्याच्या साक्षीदारांचे जबाब शपथेवर नोंदवून घ्यायला हवेत. परंतु दंडाधिकाऱ्यांनी साक्षीदारांचे शपथेवर जबाब न नोंदविताच कंगनाला समन्स काढण्याचा आदेश १ फेब्रुवारी रोजी दिल्याने तो रद्द केला जावा. तसेच या खटल्याच्या दंडाधिकार्यांपुढील कामकाजास स्थगिती दिली जावी, अशीही त्यांनी विनंती केली.
याचा प्रतिवाद करताना अख्तर यांचे वकील अॅड. जय के. भारद्वाज म्हणाले की, फिर्यादीच्या जबानीखेरीज त्यांचे अन्य कोणी साक्षीदार असतील तर त्यांचेही जबाब दंडाधिकार्यांनी नोंदवावे, असे कलम २०० सांगते. साक्षीदारच नसतील किंवा ते हजर नसतील तर त्यांचे जबाब न नोंदविण्याचा पर्याय दंडाधिकार्यांना आहे. उलट दंडाधिकार्यांनी कंगनाला समन्स काढून आरोपांना उत्तर देण्याची तिला संधी दिली आहे, असेही ते म्हणाले.
समन्सनुसार तारखेला हजर राहिली नाही म्हणून दंडाधिकार्यांनी कंगनावर जामीनपात्र वॉरन्टही काढले होते. त्यानंतर कंगना २५ मार्च रोजी दंडाधिकार्यांनी कंगनाकडून २० हजार रुपयांचा रोख जामीन व १५ हजार रुपयांची हमी घेऊन तिच्यावरील वॉरन्ट रद्द केले होते.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ‘रिपब्लिक टीव्ही’चे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानांवरून अख्तर यांनी कंगनाविरुद्ध ही बदनामीची फिर्याद दाखल केली आहे.