‘सीरम’ भारतासह गरीब देशांना देणार कोरोनाचे आणखी १० कोटी डोस

Serum will give another 10 crore doses of corona

पुणे :-‘बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ व ‘जीएव्हीआय’ या संस्थेसोबत झालेल्या करारानुसार ‘सीरम इन्स्टिट्यूट’ भारतासह इतर गरीब देशांना कोरोना लसीचे (Corona Vaccine) आणखी दहा कोटी डोस पुरवणार आहे. या देशांना यापूर्वीही १० कोटी डोस पुरविण्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता एकूण २० कोटी डोसचा पुरवठा ‘सीरम’कडून या देशांना होणार आहे. भारतासह जगभरातील ९२ देशांना जीएव्हीआयकडून लसीकरणासाठी मदत करण्यात येणार आहे.

या देशांमध्ये कोरोनाची (Corona) साथ रोखण्यासाठी बिल अ‍ॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने पहिल्या टप्प्यात  सुमारे ११०० कोटी रुपये निधी दिला आहे. आता आणखी ११०० कोटी रुपये देत लसीकरणासाठी मोठा वाटा उचलला आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटशी करार करण्यात आला आहे. सीरमने या देशांना १० कोटी लसींचे डोस पुरविण्याचे जाहीर केले होते. आता आणखी १० कोटी डोसची भर टाकण्यात आली असल्याची माहिती ‘सीरम’ने दिली. हे डोसही पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे प्रतिडोस सुमारे २२५ रुपयांना दिले जाणार आहेत.

‘अ‍ॅस्टॉझेनेका’ आणि ‘नोव्हावॅक्स’ दोन कंपन्यांच्या लसींचा पुरवठा होणार आहे.  अ‍ॅस्टॉझेनेकाची  कोविशिल्ड ही लस यशस्वी ठरल्यास ६१ देशांना आणि नोव्हावॅक्सची परिणामकारकता सिद्ध झाल्यास सर्व ९२ देशांमध्ये लसीचे वितरण केले जाणार आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत म्हणाले, जीएव्हीआय आणि गेट्स फाउंडेशनच्या सहकार्यामुळे भारतासह अन्य अल्प व मध्यम आर्थिक गटातील देशांना २०२१ मध्ये आणखी १० कोटी डोसचे उत्पादन व वितरण केले जाईल. जगातील सर्व देश, आरोग्य व आर्थिक संस्थांनी एकत्रित येत प्रत्येकापर्यंत लस पोहचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER