सेरेनाची 24 व्या स्लॅम अजिंक्यपदाकडे दमदार आगेकूच

Serena Williams - Maharashtra Today

फ्रेंच ओपनच्या (French Open Tennis) महिला गटात नाओमी ओसाका, गर्बाईन मुगुरुझा, बियांका आंद्रिस्कू, अॕशली बार्टी, अँजेलिक कर्बर अशा खेळाडू पहिल्या तीन फेऱ्यातच बाद झालेल्या आहेत पण दिग्गज सेरेना विल्यम्स (Serena Williams) मात्र आगेकूच करत आहे. महिला एकेरीच्या ड्राॕमध्ये तिच्या हाफमध्ये आता तिच्यापेक्षा वरचे मानांकन (Seeding) लाभलेली इतर एकही खेळाडू नाही. त्यामुळे आठव्या मानांकित सेरेनाचे 24 व्या ग्रँड स्लॕम विजेतेपदाचे स्वप्न यंदा साकार होईल अशी आशा बळावली आहे. तसे झाल्यास ती मार्गारेट कोर्ट यांच्या सर्वाधिक ग्रँड स्लॕम अजिंक्यपदांच्या विक्रमाची बरोबरी करेल.

2017 मध्ये आॕस्ट्रेलियन ओपन जिंकल्यापासून सेरेना 24 व्या ग्रँड स्लॕम अजिंक्यपदाचा पाठलाग करतेय. त्यानंतरच्या 11 ग्रँड स्लॕम स्पर्धांपैकी चार मध्ये ती अंतिम फेरीतही पोहोचली पण विजेतेपदाने तिला हुलकावणी दिली. आता 2018 नंतर पहिल्यांदाच ती फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत पोहोचली आहे आणि तिचा सध्याचा फॉर्म हा तिच्या गटातील इतर खेळाडूंना इशाराच आहे.तिसऱ्या फेरीत सेरेनाने आपल्या देशाच्या डॕनिएली कॉलिन्स हिच्यावर 6-4, 6-4 असा विजय मिळवला. 39 वर्षे वयातही या सामन्यातील सेरेनाचा खेळ तरूण प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडकी भरवणारा होता. दुसऱ्या सेटमध्ये 1-4 अशी मागे पडल्यावर तिने सरळ पाच गेम जिंकून सामना संपवला.

या सामन्यादरम्यान स्वतःला प्रोत्साहित करताना सेरेना म्हणाली की, मागे पडल्याने काही होत नाही, मला जिंकायलाच हवे. मला स्वतःला मी कोण आहे ते शोधायला हवे. तिथे दुसरी कुणीच नाही तर सेरेना आहे. ती मी आहे आणि हे फारच छान आहे.”

विल्यम्सच्या गटातील चारही आघाडीच्या खेळाडू आधीच बाद झालेल्या आहेत. पण अजून बरेच सामने खेळायचे आहे आणि बऱ्याच चांगल्या खेळाडूसुध्दा आहेत. या खेळात आता एवढ्या गुणवान खेळाडू आहेत की प्रत्येक सामना जिंकण्यासाठी तुम्हाला जोर लावावाच लागतो असे सेरेनाने म्हटले आहे.

तिचा पुढचा सामना आता कझाकस्तानच्या 21 व्या मानांकित एलिना रिबाकिना हिच्याशी आहे,आणि त्यात जिंकल्यास तिला व्हिक्टोरिया अझारेआकाशी लढावे लागेल. 21 वर्षीय रिबाकिना म्हणते की, सेरेना ही टेनिसची महान खेळाडू आहे.सेरेना म्हणते की तिच्यासारखी परिस्थिती कधी माझीसुध्दा होती ज्यात प्रतिस्पर्धी खेळाडूचे आपण प्रशंसक असतो पण आपल्याला त्यांच्यावर विजयसुध्दा मिळवायचा असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button