सेरेनाचे स्वप्न अधुरेच

Serena Williams
 • 24 व्या ग्रँड स्लॕम जेतेपदाची हुलकावणीच!
 • चौथ्यांदा अंतिम सामन्यात गमावली संधी
 • अडीच वर्षे आणि सात स्पर्धानंतरही प्रतीक्षा कायम

सेरेना विल्यम्सने जानेवारी 2017 मध्ये आपले शेवटचे आणि 23 वे ग्रँड स्लॕम विजेतेपद पटकावले. तेंव्हापासून मार्गारेट कोर्ट यांच्या सर्वाधिक 24 ग्रँड स्लॕम विजेतेपदांच्या विक्रमाच्या बरोबरीचे ती स्वप्न बघतेय पण आधी बाळंतपण आणि नंतर नव्या दमाच्या खेळाडूंकडून पराभवामुळे गेल्या अडीच वर्षांपासून आणि सात प्रयत्नात तिला हा विक्रम हुलकावणीच देतोय.

आत्तासुध्दा युएस ओपनच्या अंतिम सामन्यात तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या आणि पहिल्यांदाच ग्रँड स्लॕम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या कॕनेडियन बियांका आंद्रिस्कू हिने तिचे हे स्वप्न अधूरेच ठेवले आहे. सेरेना पुन्हा एकदा, गेल्या दोन वर्षात चौथ्यांदा, ग्रँड स्लॕम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाली आहे.

त्यामुळे मार्गारेट कोर्ट यांचा हा 24 स्लॕम विजेतेपदांचा विक्रम मोडला जाणे अशक्य आहे अशीच चर्चा आता होऊ लागली आहे.

सेरेनाने 2017 ची अॉस्ट्रेलियन ओपन जिंकून 23 वे ग्रँड स्लॕम विजेतेपद पटकावले तेंव्हा ती गर्भवती होती. त्यानंतर बाळंतपणामुळे 2017 च्या फ्रेंच ओपन, विम्बल्डन, युएस ओपन आणि 2018 ची अॉस्ट्रेलियन ओपन यात ती खेळलीच नाही.

2018 च्या फ्रेंच ओपनपासून ती ग्रँड स्लॕम स्पर्धांत पुन्हा खेळतेय.तेंव्हापासून चार वेळा तिने ग्रँड स्लॕम स्पर्धांची अंतिम फेरी गाठलीय पण प्रत्येक वेळी विजेतेपदाने तिला हुलकावणीच दिली आहे.

सेरेनाच्या 23 व्या ग्रँड स्लॕम विजेतेपदानंतरचा प्रवास पाहू या

 • 2017- अॉस्ट्रे. ओपन- विजेती
  (वि. व्हिनस विल्यम्स- 6-4,6-4)
 • 2017- फ्रेच ओपन- खेळली नाही
 • 2017- विम्बल्डन – खेळली नाही
 • 2017- यूएस ओपन- खेळली नाही
 • 2018- अॉस्ट्रे. ओपन- खेळली नाही
 • 2018- फ्रेंच,ओपन- चौथी फेरी
  (वि. शारापोव्हा- माघार)
 • 2018- विम्बल्डन- फायनल
  (पराभूत वि. कर्बर 3-6, 3-6)
 • 2018- यूएस ओपन- फायनल
  (पराभूत वि. ओसाका 2-6, 4-6)
 • 2019- अॉस्ट्रे. ओपन- क्वार्टर
  (पराभूत वि. प्लिस्कोव्हा 4-6, 6-4, 5-7)
 • 2019- फ्रेंच ओपन- तिसरी फेरी
  (पराभूत वि. केनिन 2-6, 5-7)
 • 2019- विम्बल्डन- फायनल
  (पराभूत वि. हालेप 2-6, 2-6)
 • 2019- यूएस ओपन- फायनल
  (पराभूत वि. आंद्रिस्कू 3-6, 5-7)