सेरेनाचा आज एक हजारावा सामना !

Serena Williams

सेरेना विल्यम्स (Serena Williams) …वयाच्या चाळीशीत पोहोचलीय, आई बनली आहे, स्पर्धात्मक टेनिस (Tennis) खेळत खेळत 25 वर्षे झाली आहेत आणि अजुनही ती खेळतेय. या प्रवासात साहजिकच विक्रमांचे कितीतरी टप्पे तिने पार केले आहेत पण आता बुधवारी रोम येथील इटालियन ओपन (Italian open) स्पर्धेत ती अतिशय महत्त्वाचा टप्पा पार पाडणार आहे तो म्हणजे आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील एक हजारावा सामना ती बुधवारी खेळणार आहे. या विशेष महत्त्वाच्या सामन्यात अर्जेंटिनाची नादिया पोदोरोस्का ही तिची प्रतिस्पर्धी असेल. या दोघींदरम्यानचा हा पहिलाच सामना असेल. यंदा आॕस्ट्रेलियन ओपनपासून म्हणजे गेल्या 10 आठवड्यात सेरेना एकही स्पर्धा खेळलेली नाही. पण आता तिच्या ह्या विशेष सामन्याकडे सर्व टेनिस जगताचे लक्ष असेल.

*पहिला सामना

सेरेनाने आॕक्टोबर 1995 मध्ये व्यायसायिक टेनिसचा सर्वात पहिला सामना खेळला होता. त्यावेळी क्युबेक येथील स्पर्धेच्या पात्रता फेरीत ती अॕन मिलरकडून 1-6, 1-6 अशी पराभूत झाली होती तर मेन ड्रॉमधील पहिला सामना ती आॕक्टोबर 1997 मध्ये माॕस्को येथील स्पर्धेत खेळली. त्यात के. पो मेसर्लीकडून 3-6, 6-7 अशी पराभूत झाली होती.

*100 वा सामना

सेरेना वि. वि. अरांता सांचेझ व्हिकारिओ 6-3, 6-1
(ग्रँड स्लॕम कप, म्युनिक, 27 सप्टेंबर 1999)

हा सामना खेळली तेंव्हा सेरेना 17 वर्षांची होती आणि युएस ओपनचे विजेतेपद तिच्या नावावर लागलेले होते. तोवर अरांताने सेरेनाविरुध्दच्या पहिल्या चार लढती जिंकलेल्या होत्या. पण या लढतीपर्यंत 4-2 अशी सेरेनाने भरपाई केलेली होती. या 100 व्या सामन्यात सेरेनाने विजय मिळवला आणि पुढे जाऊन आपलीच बहिण व्हिनसला नमवून ही स्पर्धासुध्दा जिंकली होती.

*200 वा सामना

सेरेना वि. वि. जेनिफर कॕप्रियाती 6-2, 4-6, 6-4
स्कॉटसडेल अंतिम सामना, 25 फेब्रुवारी 2002

जेनिफरने सेरेनाविरुध्दच्या पहिल्या पाच पैकी चार सामने जिंकलेले होते पण सेरेनाने पुढचे आठ सामने जिंकले. या आठ विजयातील हा दुसरा सामना होता आणि त्याने 12 वे विजेतेपद सेरेनाच्या नावावर लावले.

*300 वा सामना

सेरेना वि. वि. एलेनी दानिलीदू 6-4, 6-4
मायामी ओपन, उपांत्य फेरी, 24 मार्च 2004

2003 च्या विम्बल्डन विजेतेपदानंतर सेरेनाच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुनरागमनाची तिची हा पहिलीच स्पर्धा होती,पण त्यात अगदी सहजपणे खेळत तिने थेट स्पर्धाच जिंकली.

*400 वा सामना

सेरेना वि.वि. मारिया शारापोव्हा 6-1, 6-1
मायामी ओपन, चौथी फेरी, 21 मार्च 2007

2006 मध्ये दुखापतींनी सतावल्यावर सेरेना क्रमवारीत 95 व्या स्थानापर्यंत घसरली होती. पण त्यानंतर तिने विलक्षण कमबॕक साजरे केले. मारिया शारापोव्हाला नमवत आॕस्ट्रेलियन ओपन जिंकली. मार्च 2007 पर्यंत ती क्रमवारीत 18 व्या स्थानी पोहोचली. आणि पुन्हा एकदा तिने मारियाला नमवत 400 वा विजय मिळवला. पुढच्या 12 वर्षात सेरेना आणखी 16 वेळा मारियाशी खेळली आणि हे सर्वच्या सर्व सामने तिने जिंकले.

*500 वा सामना

सेरेना वि.वि. झेंग जी 6-4, 6-2
दुबई, तिसरी फेरी, 15 फेब्रुवारी 2009

एव्हाना सेरेना नंबर वन बनलेली होती. तिने 2008 ची युएस ओपन आणि 2009 ची आॕस्ट्रेलियन ओपन या लागोपाठच्या दोन्ही ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकल्या होत्या. झेंग ही टॉप 20 मध्ये पोहोचलेली होती. झेंगने सेरेनाविरुध्दच्या सहाच्या सहा लढती गमावलेल्या होत्या आणि त्यातला हा तिचा तिसरा सरळ सेटमधील पराभव होता. मात्र यानंतरच्या तिन लढतीत झेंगने तिला पूर्ण तीन सेट झुंजवले होते.

*600 वा सामना

सेरेना पराभूत वि. सामंथा स्टोसूर 2-6, 3-6
युएस ओपन अंतिम सामना, 29 आॕगस्ट 2011

सेरेनाचा हा पराभव धक्कादायक होता. 2010 मध्ये काचेवर पाय ठेवल्याने दुखापत झाल्यानंतर आणि काही आजारानंतर तिचे हे आणखीन एक पुनरागमन होते. सलग 18 सामने जिंकून ती स्टॕनफोर्ड व टोरांटो येथील स्पर्धेत विजेती ठरली होती. युएस ओपनमध्ये 27 व्या क्रमांकाची खेळाडू म्हणून खेळताना ती अंतिम फेरीत धडकली होती. सामंथाने त्याच्याआधी दोन वेळा सेरेनाला नमवलेले होते आणि आता तिसऱ्यांदा नमवून ती सेरेनाला ग्रँड स्लॕमच्या अंतिम सामन्यात नमवणारी व्हिनस व शारापोव्हानंतरची ती पहिलीच खेळाडू ठरली.

*700 वा सामना

सेरेना वि.वि. व्हिक्टोरिया अझारेंका 6-1, 6-3
रोम, अंतिम फेरी, 13 मे 2013

2013 हे सेरेनाचे सर्वात यशस्वी वर्ष होते. तिने ह्या वर्षात 11 विजेतेपदं पटकावली आणि 78-4 अशी तिची कामगिरी राहिली. रोममध्ये ती 2002 नंतर पहिल्यांदा विजेती ठरली. रोममध्ये अंतिम फेरीपर्यंत कोणत्याही सामन्यात तिने तीन पेक्षा अधिक गेम गमावले नाहीत. नंबर वन राहिलेली अझारेंकासुध्दा फक्त चारच गेम घेऊ शकली.

*800 वा सामना

सेरेना वि. वि. अॕना इव्हानोव्हिक 6-4, 6-4
डब्ल्यूटीए फायनल्स, सिंगापूर साखळी सामना, 20 आॕक्टोबर 2014

सेरेना नंबर वनपदी कायमच होती. 18 स्लॕम विजेतेपदं तिच्या नावावर लागलेली होती. 800 वा विजय नोंदवताना तिने अॕना इव्हानोव्हिकवर पाच सामन्यांतला चौथा विजय नोंदवला. मात्र याच्या पुढच्याच सामन्यात ती सिमोना हालेपकडून 6-0, 6-2 अशी पराभूत झाली होती. पण तरीही पाचव्यांदा ती डब्ल्युटीए फायनल्सची ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरली होती.

*900 वा सामना

सेरेना वि.वि. वानिया किंग 6-3, 6-3
युएस ओपन, दुसरी फेरी, 29 आॕगस्ट 2016

2016 मध्ये सेरेना जवळपास सगळीकडे जिंकत होती. स्टेफीच्या 22 स्लॕम विजेतेपदांची तिने बरोबरी केलेली होती. आणि दुसऱ्या फेरीचा हा सामना जिंकून तिने मार्टिना नवरातिलोवाच्या 306 ग्रँड स्लॕम सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र उपांत्य फेरीत ती कॕरोलिना प्लिस्कोव्हाकडून पराभूत झाली आणि तिने नंबर वन स्थान गमावले.

*1000 वा सामना

सेरेना वि. नादिया पोदोरोस्का- ?????
रोम, दुसरी फेरी, 12 मे 2021

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button