सेरेना समर्थकांनी निवृत्तीतही शारापोव्हावर टीका करणे सोडले नाही

मारिया शारापोव्हाच्या निवृत्तीची टेनिस जगतात सध्या चर्चा आहे. साधारणपणे निवृत्तीवेळी कुणाबद्दलही चांगलेच बोलतात पण व्यावसायिक टेनीसमध्ये शारापोव्हा व सेरेना विल्यम्सच्या प्रतिस्पर्धेने एवढे टोक गाठलेय की या निवृत्तीवर सेरेनाने स्वतः कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि सेरेनाच्या समर्थकांनी निवृत्तीवेळीसुध्दा मारियावर शेरेबाजी करण्यास मागेपुढे पाहिलेले नाही.

तुम्हाला मारियाची कारकिर्द कशासाठी स्मरणात राहील? या प्रश्नाच्या उत्तरात सेरेना समर्थकांनी ‘सेरेनाकडून पुन्हा पुन्हा हरण्यासाठी’ असा टोमणा मारला आहे. सेरेनाविरुध्दच्या 23 सामन्यांपैकी शारापोव्हा फक्त तीनच सामने जिंकली आहे मात्र यातील शेवटचा सामना 2018 च्या फ्रेंच ओपनमध्ये सेरेनाने प्रकृतीच्या कारणास्तव न खेळताच सोडून दिला होता त्यामुळे खऱ्या अर्थाने शारापोव्हाला सेरेनाविरुध्द केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. 2004 नंतर ती एकदाही सेरेनाला हरवू शकलेली नाही. त्यामुळे सेरेनाचे चाहते म्हणतात की, जी 16-16 वर्ष सेरेनाला एकाही सामन्यात हरवू शकली नाही, ती कसली आलीय ग्रेट? ती कसली हॉल आफ फेम? काहींनी तर म्हटलेय की, सेरेनाला हरविण्यासाठी तिने स्टेराइडस् सुध्दा घेतले पण ती हरवू शकली नाही. मारच खात राहिली. एकाने म्हटलेय की मारिया शारापोव्हा कायम आमच्या हृदयात आणि सेरेनाच्या छायेतच राहिल.

महिला क्रिकेटमध्ये हिदर नाईटने गाठला मैलाचा दगड

याच मारियाने पार्श्वभूमीवर एक विधान केलेय. त्यात तिने म्हटलेय की आपल्या निवृत्तीच्या निर्णयामागे सेरेना हेच एक कारण आहे.गेल्या वर्षी युएस ओपनमध्ये सेरेनाने मारियाचा 6-1, 6-1 असा धुव्वा उडवला होता. या सामन्यानेच आपल्या निवृत्तीची आता वेळ आली आहे याची जाणिव झाल्याचे शारापोव्हाने म्हटले आहे. मारियाने म्हटलेय की, आपल्या यशाचे रहस्य हेच आहे की, मी कधी भूतकाळाचा विचार करत बसले नाही आणि भविष्याचाही विचार केला नाही. आता पुरे असे केंव्हा वाटले? याबद्दल शारापोव्हा म्हणते गेल्या वर्षीच्या युएस ओपनमध्ये मैदानावर उतरण्याच्या आधी माझ्या खांद्यांवर काम सुरु होते.

खांदेदुखी माझ्यासाठी नवीन नव्हती. 2008 मध्ये आणि गेल्या वर्षी मी शस्त्रक्रिया केली होती. त्यादिवशी वेदना होत असतानाही मैदानात उतरणे हाच माझ्यासाठी विजय होता,मी सहानूभुतीसाठी हे सांगत नाही तर माझे शरीर हेच मोठी बाधा ठरले होते हे सांगण्यासाठी मांडतेय असे तिने म्हटले आहे. सेरेनाचे समर्थक शारापोव्हाला कितीही हिणवत असले तरी जागतिक क्रमवारीत ती तिच्यापेक्षा कमी वयात नंबर वन बनली होती, 2003 ते 2015 अशी सलग 13 वर्षे तिने किमान एकतरी विजेतेपद पटकावले आहे हा विक्रम सेरेनालासुध्दा जमलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.