शेअर बाजारात तेजीची गुढी

Sensex

मुंबई : कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊन घोषित करणे आणि अर्थ मंत्रालयाने आर्थिक पॅकेजची घोषणा करणे याचा सकारत्मक परिणाम आज बाजारावर झाला. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६०० अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४५० अंकांची वाढ झाली आहे.

कोरोनाच्या संकटात अर्थमंत्र्यांनी कर परताव्यात दिला दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी करोना व्हायरसपासून देशाला वाचविण्यासाठी आगामी २१ दिवसांसाठी ‘भारत लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. आज (मंगळवारी) मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’ सुरू होणार आहे. लॉकडाऊनमुळे भारतातील करोनाचा प्रसार आटोक्यात येईल,अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा खरेदीकडे वळले आहेत. मागील अनेक सत्रात मोठ्या प्रमाणात स्वस्त झालेल्या ब्ल्यूचीप शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.

आज ऍक्सिस बँक, रिलायन्स, मारुती,एचडीफसी , कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस हे शेअर तेजीत होते. सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर तेजीत आहेत. आजच्या तेजीने सेन्सेक्स २८ हजार अंकावर गेला आहे.

मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६९२.७९ अंक वर जाऊन २६,६७४.०३ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९०.८० अंक वाढून ७,८०१.०५ वर स्थिरावला.