खरेदीच्या सपाट्यामुळे शेअर बाजारात तेजी

मुंबई : शेअर बाजारात आजही खरेदीचा ओघ कायम होता. सकाळच्या सत्रात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात तेजी होती. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५३. २८ अंकांनी वधारला आणि त्याने ४१ हजार १४२. ६६ व निफ्टी १०९. ५० ने वाढून १२ हजार ८९. १५ वर पोहचला.

बजाज ऑटो, एलअँडटी, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रीड, एचसीएल टेक, एनटीपीसी, एसबीआय, मारुती, टाटा स्टील, भारती एअरटेल, डीएलएफ, एचपीसीएल, डिव्हीज लॅब, अदानी गॅस, बॉश्चचे शेअर तेजीत आहेत. ओएनजीसी, कोटक बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टायटनच्या शेअरमध्ये घसरण झाली. येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसली, तो ८ टक्क्यांनी वधारला.

देशांतर्गत उत्पादनात वाढ झाली असून जानेवारी महिन्यात उत्पादन क्षेत्राचा वृद्धिदर वाढला आहे. मंदीने होरपळणाऱ्या औद्योगिक क्षेत्रासाठी उत्पादनाचा वृद्धिदर गेल्या आठ वर्षातील सर्वोत्तम ठरला आहे. जानेवारीत ‘निक्की मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ ५५.३ वर गेला आहे. फेब्रुवारी २०१२ नंतर ही दमदार आकडेवारी आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजारांमधील तेजीचे पडसाद आज भारतीय बाजारांवर उमटले. मंगळवारी अमेरिकेतील ‘डाऊ जोन्स’ ४०७ अंकांनी वधारला. ‘एसअँडपी ५००’ हा निर्देशांक ४८ अंकांनी वधारला होता. चीनमधील ‘करोना व्हायरस’च्या धक्क्यातून आशियातील शेअर बाजार सावरले आहेत. जपान आणि ऑस्ट्रेलियातील शेअर निर्देशांकात आज वाढ दिसून आली.