सेन्सेक्स तेजीत ; दीड तासात गुंतवणूकदारांनी कमावले २ लाख कोटी

sensex-

मुंबई : जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी झाल्याने सरकारला दिलासा मिळेल, या आशेने आज गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. ४ फेब्रुवारीच्या सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स ७८० अंकांनी तर निफ्टी २४० अंकांनी उसळला.

शनिवारी अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात १००० अंकांची घसरण झाली होती. मात्र आजच्या तेजीत दीड तासात गुंतवणूकदारांची २ लाख कोटींची कमाई केली.

आज बँका, वित्त संस्था, तेल आणि वायू, पायाभूत सेवा या क्षेत्रात तेजी दिसली. अनेक बड्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. वेलस्पन कॉर्प, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, पिरामल एन्टरप्राइजेस, एमसीएक्स, हिंदाल्को, जीआयसी हौसिंग , एडलवाईज, जिंदाल सॉ शेअर वाढत आहेत.

सोमवारी कंपन्यांचे बाजार भांडवल १५३.७२ लाख कोटी होते. आज सकाळपासून बाजारात तेजीची लाट असून कंपन्यांचे बाजार भांडवल १५५.७२ लाख कोटींपर्यंत वाढले.

जागतिक कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमती ३.८ टक्क्यांची घसरल्या. खनिज तेलाचा दर ५४.४५ डॉलर बॅरल आहे. खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण केंद्र सरकारसाठी फायदेशीर ठरणार आहे. भारत जवळपास ८० टक्के खनिज तेलाची आयात करतो. तेलाचे दर कमी झाल्याने आयात खर्चात बचत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारने लाभांश वितरण कर रद्द करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे जादा लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सला आज मोठी मागणी आली. ‘टीसीएस’ आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांचे शेअर तेजीत होते.