शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर खळबळ

badgeमंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप यावरून दोन काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. नागपूर अधिवेशनानंतर म्हणजे २२ डिसेंबरनंतर विस्तार करावा असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. पण काँग्रेसला हे मान्य नाही. मंत्र्यांची यादी फायनल करून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सोनिया गांधींकडे पोचले आहेत. दोन काँग्रेसच्या ह्या कुरघोडीच्या राजकारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पिसले जात आहेत. ‘माझे ऐकत नसाल तर मला नरेंद्र मोदींची ऑफर तयार आहे’ असा इशारा नुकताच देऊन राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला गॅसवर ठेवले आहे.

ही बातमी पण वाचा : उपमुख्यमंत्र्याविना भरणार नागपूर अधिवेशन

नागपूर अधिवेशन तोंडावर म्हणजे अवघ्या १३ दिवसांवर आले आहे. आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव यांच्यासह फक्त सहा  मंत्र्यांचा २८ नोव्हेंबरला शपथविधी झाला होता. त्यांचेही खातेवाटप अजून झालेले नाही. खातेच नसल्याने सहा मंत्री रिकामे बसले आहेत. ‘आम्ही आमचा उपमुख्यमंत्री नागपूर अधिवेशनानंतर देऊ’ असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितल्याने इच्छुक मंत्र्यांप्रमाणे अधिकाऱ्यांचीही धाकधूक वाढली आहे. सहा मंत्र्यांमध्ये अधिवेशन चालवणे अवघड आहे, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने आता महाआघाडीमध्ये धावपळ सुरू झाली आहे. काँग्रेसची यादी सोनिया यांनी अजून फायनल केलेली नाही आणि राष्ट्रवादीच्या यादीची तर चर्चाच नाही. तीन पायांच्या ह्या सरकारचे कसे होणार? राज्याला काळजी लागली आहे.

शरद पवार यांचा स्वभाव आतल्या गाठीचा आहे. ते सहसा बोलत नाहीत. पण २० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली चर्चा त्यांनी एका वाहिनीशी झालेल्या मुलाखतीत उघड केल्याने शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खळबळ आहे. ‘मोदींनी आपल्याला एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती’ असे जाहीर करून पवारांनी काय साधले? उद्धव यांच्यावरचा दबाव वाढवला असे राजकीय विश्लेषक मानत आहेत. ‘हे सरकार आपण सांगतो तसे चालले नाही तर भाजपसोबत जाऊ’ असे सूचित करून पवारांनी एका बाणात अनेक पक्षी मारले आहेत. ह्या इशाऱ्याने शिवसेना तर अस्वस्थ झाली आहेच. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही सरकारमध्ये किती दिवस राहायचे ह्या मानसिकतेत पोचले आहेत.