पत्नीला मारहाण करणारा पोलीस अधिकारी म्हणतो – हा घरगुती वाद, गुन्हा नाही !

Purushottam Sharma

भोपाळ : मध्य प्रदेशाचे पोलीस महासंचालक पुरुषोत्तम शर्मा ( Purushottam Sharma) यांचा पत्नीला मारहाण करण्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून त्यांना तत्काळ पदावरून मुक्त केले आहे.

या प्रकरणात स्वतःचा बचाव करताना शर्मा म्हणाले की, या प्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाही. हा गुन्हा नाही, घरगुती वाद आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की – मी पत्नीचा अपमान केला असता तर तिने तक्रार केली असती. मी हिंसक किंवा गुन्हेगार वृत्तीचा माणूस नाही. माझ्याबद्दल जे घडले ते वाईट आहे. माझ्या पत्नीने माझ्या नकळत घरात कॅमेरे लावलेत. आमच्या लग्नाला ३२ वर्ष झालेत. पत्नीने माझ्याविरुद्ध २००८ ला तक्रार केली होती. त्यानंतर ती माझ्या घरात राहते आहे. परदेशवारीसह सर्व गोष्टी माझ्या पैशाने उपभोगते आहे.

शर्मा हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. व्हायरल व्हीडीओत सुरुवातीला शर्मा आणि पत्नीचा वाद होताना दिसतो. शर्मा पत्नीला फरशीवर पडतात आणि मारतात. ही मारहाण सुरू असताना त्यांचा कुत्रा भुंकत खोलीत इकडे – तिकडे पळत असतो.

कायदा हातात घेणाऱ्याविरुद्ध कारवाई होणारच – मुख्यमंत्री

या विषयांवर बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहाण (Shivraj Singh Chouhan) म्हणाले की – शर्मा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. जबाबदार पदावर असलेला कोणीही बेकायदा वागताना किंवा कायदा हातात घेताना आढळला तर, तो कोणीही असला तरी कारवाई होणारच.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले – मी तो व्हीडीओ पाहिला आहे. त्याबद्दल वाचलेही आहे. या प्रकरणी रीतसर तक्रार आली तर पाहता येईल.

योग्य शिक्षा द्या – महिला आयोग

राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी ट्विट करून मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहाण यांच्याकडे मागणी केली की, या अधिकाऱ्याला योग्य शिक्षा द्या. या घटनेने समाजात चुकीचा संदेश गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER