ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे कोरोनाने निधन

Radhakrushna Narvekar

मुंबई : ‘मुंबई सकाळ’चे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (Senior journalist Radhakrishna Narvekar) यांचे कोरोनाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. नुकतीच कोरोनावर मात करून ते घरी परतले होते. काल रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही कोरोनाने (Corona) निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुली, जावई आणि मोठा आप्तपरिवार आहे.

मराठी पत्रकारितेत ते जवळपास ६० वर्षे कार्यरत होते. नार्वेकर यांनी दैनिक ‘नवाकाळ’चे बातमीदार, दैनिक ‘सकाळ’ चे संपादक, दैनिक ‘पुण्यनगरी’ वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक ही सर्व महत्त्वाची जबाबदारीची पदे भूषविली आहेत. संपादक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ‘सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे पुस्तक लिहिले आणि लोकप्रिय ठरले. त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामांकित पत्रकार आणि संपादकांच्या विकासात नार्वेकरांचे योगदान अमूल्य आहे.

कोकणातील आरोंदा या गावातून मुंबईत आलेल्या नार्वेकर यांनी आपली कोकणची बांधिलकी अखेरपर्यंत जपली. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मुंबई शहरांच्या विकासाकरिता ‘मुंबई सकाळ’च्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी अचूकपणे पार पाडली.

दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. नार्वेकर संपादक या नात्याने विविध देशांत महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. त्यांच्या पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. राधाकृष्ण नार्वेकर यांनी पत्रकारहिताच्या अनेक योजना राबवल्या होत्या . मुंबईतील मराठा हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाजहितासाठी झटणारे आणि अनेकांना तसे झटण्याची, लोकाभिमुख पत्रकारितेची प्रेरणा देणारे नार्वेकर हे पत्रकारितेचे विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button