हुशार मुलगा मेरिटमध्ये येण्याचा हट्ट कॉपी करून पुरा करतोय

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर टोले बाजी

Bhau Torsekar - Sharad Pawar

औरंगाबाद : शरद पवार जे बोलतात नेमके त्याच्या विरोधात कृती करतात. विधानसभा निवडणुकीनंतर ते सुरुवातीला विरोधी पक्षात बसू , असे म्हणाले होते. आता ते सरकार पाच वर्षे टिकेल असे म्हणत आहेत. पवारांनी १९८० मध्ये ५४ आमदार घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडत सत्ता स्थापन केली होती. आताही त्यांचे ५४ आमदारच आहेत. मात्र तरीही ते कॉपी करून उत्तीर्ण होण्यावर भर देतात.

हुशार मुलगा मेरिटमध्ये येण्याचा हट्ट कॉपी करून पुरा करतोय, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर टोलेबाजी केली. शहरातील काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ताेरसेकर यांनी राज्याच्या राजकारणावर व माध्यमांवरही तोंडसुख घेतले. ते म्हणाले, खरे तर कुणी बेताल वक्तव्ये केली तर ती छापायची नसतात.

परंतु हल्ली माध्यमांमध्ये अशा बाबींचाच जास्त भरणा दिसून येतो. ‘शरद पवार यांना एका व्यक्तीने एकदा थोबाडीत मारली’, पण माध्यमांनी दिवसरात्र तेच दाखवले. खासदार शरद यादव म्हणाले होते की,’त्या नागरिकाने एकदा पवारांना मारले; परंतु माध्यमांनी तर शंभर वेळा मारले.’ अशा प्रकारामुळे माध्यमं प्रबोधनाची जबाबदारी विसरल्याचे दिसून येते, असेही तोरसेकर म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, केडर नसल्यामुळे हा पक्ष आता संपला आहे. भाजप किमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षित हातांमध्ये आहे. काँग्रेसमध्ये ज्यांचे इंटरेस्ट होते ती व्यवस्था आता संपली आहे. आता केवळ उत्तम व्यावसायिक, हॉटेल मालक, काही व्यापारी, उद्योजक त्यात शिल्लक राहिले आहेत. केवळ श्रेष्ठी म्हणून काँग्रेस चालते आहे.

राहुल गांधी हा मोदींनी ठरवलेला उमेदवार
राहुल गांधी हा मोदींनी ठरवलेला उमेदवार आहे. मोदींनी राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे केले. त्यानंतर काँग्रेसही दलित उमेदवारांना प्राधान्य देत आहे. म्हणजे काँग्रेसला मोदी आपल्या ट्रॅपमध्ये सोयीस्करपणे अडकवत आहेत, असे दिसते.