अखेर शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर; अरविंद सावंत आज मंत्रीपदाचा राजीनामा देणार

Arvind Sawant

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद आता चिघळला आहे . शिवसेना आता भाजपामधून तडकाफडकी बाहेर पडण्याच्या तयारीत असून शिवसेनेचे केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे .

लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सावंत यांनी ट्विट करून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना (भाजपा आणि शिवसेना) तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. तसेच आपण आज सकाळी ११.०० वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषद घेणार आहे,” असं सावंत यांनी ट्विट करून सांगितल आहे.