पवारांच्या गुगलीने शिवसेना आमदारांमध्ये चिंतेचं वातावरण

sharad pawar-shivsena

मुंबई : राज्यातील सत्तेचा गुंता सोडवण्यासाठी सोमवारी राजधानी दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमच्यात कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक होती. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चाच झाली नाही, अशी गुगली टाकत पवारांनी शिवसेनेला पुन्हा गॅसवर ठेवलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात पुन्हा भाजपाच ?

विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणारे भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून विभक्त झाले. त्यांनतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठींब्याने एक पर्यायी सरकार म्हणून शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याचे दावे या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आले होते. विशेष म्हणजे यासाठी या पक्षातील नेत्यांची बैठकांवर-बैठकांचा दौर सुरु होता. त्यामुळे आपण सत्तेत येणार असल्याची हमी या तिन्ही पक्षातील नवनिर्वाचित आमदारांना वाटत होती.

मात्र सोमवारी शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे आता शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारांना पुन्हा सत्तेत बसण्याची अपेक्षा लागली होती. तर काही आमदारांनी आपल्यालाला मंत्रीपद मिळणारच असे दावे सुद्धा केले होते. मात्र आता पवारांच्या भुमिकेनंतर भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.