सेनेने फोडला महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ!

कोल्हापूर : शिवसैनिक पराभवाने खचून जात नाही. कामाला लागा, हीच ती वेळ विधानसभा पराभवाचा वचपा काढण्याची असे भावनिक आवाहन करून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना बळ दिले. महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिंदें यांच्या दौऱ्यानिमित्ताने शिवसेनेने महापालिका प्रचाराचा नारळच फोडला.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित करून शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर शहरात रस्ते, थेट पाईप लाईन, ड्रेनेज, रंकाळा संवर्धन, शाहू महाराज स्मारक, शाहू जन्मस्थळ,केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदानचे प्रश्न अनेक वर्ष अपुऱ्या निधी मुळे प्रलंबीत आहेत. निधी मिळवण्यासाठी स्थानिक महापालिका प्रशासन हे प्रयत्न करत आहेच; पण व्यवस्थापनावर ६२ टक्के खर्च करणाऱ्या महापालिकेला विकास कामासाठी निधीची कमतरता भासू लागली आहे; पण एकाच दिवसात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कोल्हापूरसाठी शिवसेना खूप काही करायला तयार आहे हे अप्रत्यक्षपणे दाखवून देत, कोल्हापूर शहराच्या विकासकामासाठी काही ना काही तरी देण्याची घोषणा करत आगामी निवडणूकीत शिवसेना ताकदीने उतरण्याचे ना. शिंदे संकेत दिले.

पराभावाचे वचपे काढा व पुढील निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा निवडून आणा या ना. शिंदे यांच्या आवाहनामुळे, विधानसभा निवडणुकीत सेनेच्या पाच आमदारांचा पराभव झाला हा मातोश्रीच्या जीव्हारी लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील रंगत वाढत जाणार आहे. सध्या सेनेचे चार नगरसेवक महापालिकेत आहेत त्याचे चाळीस होणार का हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER