आत्मदहन प्रकरण : नगरपालिका बरखास्त करा शिवसेनेची मागणी

आत्मदहन प्रकरण - नगरपालिका बरखास्त करा शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी काल (सोमवार) आत्मदहन केले. यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेनेने (Shiv Sena) इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत नगरपरिषद बरखास्त करण्याची मागणी केली. प्रांताधिकारी विकास खरात यांना याबाबत शिवसेना पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले.

इचलकरंजी नगर परिषदेमध्ये सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. याबाबत रोज अनेक तक्रारी नगर परिषदेकडे येतात. मात्र, त्याकडे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. कचरा, साफसफाई, आरोग्य सुविधा या मूलभूत सुविधांचे तीन-तेरा वाजले आहेत. भोरे यांनी या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांच्या मृत्यूला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांनी केला आहे.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील शहापूर रस्त्यावरून मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी घंटागाडीला बांधून रस्त्यावरून फरफटत ओढून नेले जात होते. हा प्रकार नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मृत डुक्कर बांधून ओढत नेणाऱ्या घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरून संबंधित गाडीचालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच, त्याच्यावर दहशत निर्माण करून भोरे यांना चक्क मेलेले डुकर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते. या घटनेच्या निषेधार्थ भोरे यांनी संबंधितावर कारवाई व्हावी, याबाबत निवेदन दिले होते. मात्र, कारवाई झाली नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याचीही दखल घेतली नसल्याने काल भोरे यांनी नगरपालिका परिसरातच अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले, यात त्यांचा जीव गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER