परिवहन समिती सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित

transport committee members fixed

ठाणे : ठाणे परिवहन समितीच्या 12 सदस्यांची निवडणुक येत्या 4 मार्च होणार आहे. परंतु या निवडणुकीत 2 अर्ज जास्तीचे आल्याने भाजपची धाकधुक वाढली होती. अखेर भाजपची धाकधुक कमी झाली असून शिवसेनेचा एक आणि कॉंग्रेसच्या एकाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने परिवहन समिती सदस्यांची निवडणुक आता बिनविरोध पार पडणार आहे. त्यामुळे भाजपवाल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ठाणेमहापालिकेतील नगरसेवकांच्या पक्षीय बलानुसार परिवहन समितीमध्ये शिवसेनेचे सात, राष्ट्रवादीचे तीन आणि भाजपचे दोन सदस्य जाणो अपेक्षित होते. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याची दिवशी कॉंग्रेसने यात उडी घेतल्याने शिवसेनेने देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

त्यामुळे बिनविरोध होणारी निवडणुक लांबणीवर पडली. शिवसेना आणि कॉंग्रेसच्या या खेळीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. सदस्य वाढल्याने क्रॉस वोटींगचा फटका भाजपच्या सदस्यांनाही बसण्याची शक्यता निर्माण झाली होती.

त्यामुळे भाजपच्या गटनेत्यांकडून सर्व नगरसेवकांना व्हिप सुध्दा जारी केला होता. परंतु आता भाजपची डोकेदुखी कमी झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेकडून राजेंद्र महाडीक आणि कॉंग्रेसकडून राम भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता परिवहन समिती सदस्यांची निवड ही बिनविरोध निश्चित मानली जात आहे. त्यासाठीची केवळ औपचारीकता शिल्लक राहिली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसने माघार घेतल्याने या निवडणुकीत होणारा घोडबाजारही टळला असून भाजपने देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.