सेहवाग म्हणतो, ऑस्ट्रेलिया जाने को तैयार हूँ!

Virendra Sehwag

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय क्रिकेटपटूंना होणाऱ्या दुखापती पाहता आता आपल्या काळचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने (virendra Sehwag) एका व्टिटद्वारे आपण ऑस्ट्रेलियात जाऊन खेळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या ट्विटवरुन सोशल मीडियावर मीम्स व कॉमे्ंटसचा पूर आला आहे.

‘विरु पाजी’ म्हणून लोकप्रीय असलेल्या सेहवागने आपल्या व्टीटमध्ये म्हटलेय, ‘इतने सब प्लेयर्स इंजुर्ड है, ११ ना हो रहे हो तो ऑस्ट्रेलिया जाने को तैयार हूँ, क्वारंटीन देख लेंगे @ बीसीसीआय!’

ताज्या दुखापतीमध्ये भारतीय आक्रमणाचा कणा असलेला मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमरा हा जायबंदी झाला आहे. त्यामुळे तो चौथ्या कसोटीत खेळू शकणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. याशिवाय मयंक अगरवाल आणि रवीचंद्रन अश्विन हेसुद्धा खेळू शकतील का याबद्दल साशंकता आहे. बुमराला पोटात दुखणे (abdominal strain) उमळले आहे.

ब्रिस्बेन कसोटीत हनुमा विहारीच्या जागी खेळेल अशी शक्यता असलेल्या मयंक अगरवालच्याही हातावर चेंडू आदळला असून त्याला हेयरलाईन फ्रॅक्चर असण्याचा अंदाज आहे. हे कमी की काय, रविचंद्रन अश्वीनची पाठदुखी गंभीर झाली आहे. त्यामुळे भारताचे ११ तरी खेळाडू चौथ्या कसोटीसाठी होतील का अशी अभूतपूर्व परिस्थिती उदभवली आहे. त्या पार्श्वभूमीवर सेहवागचे हे व्टिट आले आहे. बुमरा याला सिडनी कसोटीच्या खेळादरम्यान पोटांच्या स्नायूंवर ताण पडल्याचे निदान झाले आहे. त्याच्या चाचण्यांमध्ये हे स्पष्ट झाले असून इंग्लंडविरुध्दची आगामी मालिका लक्षात घेता भारतीय संघव्यवस्थापन त्याला खेळवण्याचा धोका पत्करू इच्छित नाही.

त्यामुळे ब्रिस्बेन कसोटीत भारतीय आक्रमाणाची सुत्रे आता केवळ दोनच कसोटी सामने खेळलेला मोहम्मद सिराज हाताळेल आणि त्याच्या साथीला नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर व टी. नटराजन हे असतील. ब्रिस्बेन कसोटीला १५ तारखेपासून सुरुवात होत आहे.

गोलंदाजीत पर्याय असले तरी भारताच्या फलंदाजीचे संकट गहिरे झाले आहे. के.एल.राहुल व हनुमा विहारी जायबंदी असल्याने आता भारताकडे मधल्या फळीसाठी केवळ पृथ्वी शॉ हा एकच पर्याय आहे. मयंक अगरवालचे फ्रॅक्चर नसले तर भारतीय संघाला दिलासा मिळणार आहे.

सेहवागने ऑस्ट्रेलियाविरुध्द २२ कसोटी सामने खेळले असून त्यात ४१ च्या सरासरीने तीन शतकांसह त्याने १७३८ धावा केल्या आहेत. यापैकी ११ सामने, १०३१ धावा आणि दोन शतके ऑस्ट्रेलियातील आहेत आणि ऑस्ट्रेलियात त्याची सरासरीसुध्दा ४६.४६ अशी चांगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER