तुमचे पराक्रम पाहता तुम्हाला अनेक गोष्टींची खंत वाटली पाहिजे – चंद्रकांत पाटलांचा टोमणा

chandrakant patil - uddhav thackeray - Maharastra Today

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर होत असलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या व राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग या सर्व घडामोडींबाबत काल (बुधवार) च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया उमटली. उद्विग्न होऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेत, आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही !

यावर भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोमणा मारला, अहो उद्धवजी… राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे !

याशिवाय इतर मुद्यांवरही ट्विट करून चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. “राज्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांचे काय वैर आहे देव जाणे? शेतकरी ठाकरे सरकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना आपली व्यथा सरकारच्या दारी मांडून मदतीची याचना करण्याऐवजी त्यांना जीव देणे जास्त सोपे वाटते. तुम्हाला याची खंत वाटत नाही का?”

बुलेट ट्रेन व वाढीव वीज बिल –

“केवळ आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मुंबईच्या मेट्रोचा खेळखंडोबा केला. मुंबईतील चाकरमान्यांना दिवसभर काम करून पुन्हा त्याच वाहतूक कोंडीचा नाहक त्रास तुमच्यामुळे सहन करावा लागतो आहे. तुम्हाला याची खंत वाटत नाही का ? करोना महामारीमुळे आधीच आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गोरगरीब जनतेला दिलासा देण्याऐवजी तुमच्या सरकारने त्यांना वाढीव वीजबिलाचा झटका दिला आणि ते भरू न शकणाऱ्या गोरगरीब जनतेचे वीज कनेक्शन खंडित केले. या मोगलाईची तुम्हाला खंत वाटत नाही का?” असे दुसरे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहे.

मराठा आरक्षण

“विदर्भ- मराठवाडा हे महाराष्ट्राचा भाग नसल्यासारखे तुमचे सरकार वागते आहे. या सरकारला विदर्भ-मराठवाड्याचा एवढा द्वेष का आहे? विदर्भ-मराठवाडा वैधानिक महामंडळ ते सर्वच प्रकारच्या विकासाच्या बाबतीत या सरकारने विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय केला. तुम्हाला याची खंत वाटत नाही का? मराठा समाजाला अथक परिश्रमाने मिळालेले आरक्षण उद्धव ठाकरे तुम्ही आपल्या कर्मदरिद्रीपणामुळे गमावले. अनेक मराठा तरुण-तरुणी तुमच्या या मूर्खपणाची शिक्षा भोगत आहेत. तुम्हाला याची खंत वाटत नाही का?” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यावर टीका केली.

महिला अत्याचार

“राज्यात दिवसागणिक महिला अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. तुमच्या सरकारमधील मंत्र्यांवरच महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. तुम्ही स्वतः एका मंत्र्याची या आरोपामुळे मंत्रिपदावरून गच्छन्ति केली आहे. राज्य महिला अत्याचाराचे विक्रम रचत आहे, तुम्हाला याची खंत वाटत नाही का?” असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER